बहुमजली वाहनतळ बांधकामाचा इमारतींना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:25+5:302021-03-23T04:26:25+5:30
कोल्हापूर : ताराबाई रोडवर उभारण्यात येत असलेल्या बहुमजली वाहनतळाच्या बांधकामाकरिता खुदाई करण्यात आल्यामुळे शेजारील बाबूजमाल दर्ग्यासह आजूबाजूच्या इमारतींना धोका ...
कोल्हापूर : ताराबाई रोडवर उभारण्यात येत असलेल्या बहुमजली वाहनतळाच्या बांधकामाकरिता खुदाई करण्यात आल्यामुळे शेजारील बाबूजमाल दर्ग्यासह आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला असल्याने जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत काम त्वरित थांबवावे, अशी मागणी मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने गणी आजरेकर व कादर मलबारी यांनी निवेदनाद्वारे महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बहुमजली वाहनतळासाठी मागील चार महिन्यांपासून बाबुजमाल दर्ग्याच्या जागेत खड्डा काढून ठेवल्यामुळे दोन जुनी नारळाची झाडे पडली आहेत. आजूबाजूची जमीन खचली आहे. त्यामुळे शेजारच्या इमारती खचण्याची व पडण्याची शक्यता आहे. या कामामुळे सांडपाण्याची पाईप तुटून सर्व पाणी बांधकामामध्ये साचत आहे. बांधकामासाठी मुरुम व दगडांचा वापर न करता पांढरी माती वापरली जात आहे. त्यामुळे भविष्यात इमारत उभी राहिली आणि ती खचली तर जबाबदार कोण? भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत पुरेशी खबरदारी घेतली जात नाही तोपर्यंत बांधकाम थांबवावे, अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
खबरदारी घेण्याच्या सूचना -
आता काम थांबविणे अशक्य आहे. कंत्राटदारांना पुरेशी खबरदारी घ्यायला सांगण्यात आले आहे. जर का दर्ग्याच्या परिसराचे काही नुकसान झाले असल्यास ती भरपाई दुरुस्तीच्या रूपाने करून देण्यास ठेकेदाराना सांगण्यात आले आहे, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
फोटो : २२०३२०२१-कोल-वाहनतळ
कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील बहुमजली वाहनतळासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे.