अंबाबाई मंदिर शिखरावर ५ फूट उंचीचे १ हजार टन धोकादायक कोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:23 PM2020-12-17T18:23:55+5:302020-12-17T18:26:53+5:30
Mahalaxmi Temple Kolhapur , Mahesh Jadhav करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने सिमेंटचा ५ फूट थराचा कोबा करण्यात आला आहे, यामुळे शिखरासह छताची बांधणीही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला आहे.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने सिमेंटचा ५ फूट थराचा कोबा करण्यात आला आहे, यामुळे शिखरासह छताची बांधणीही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला आहे.
हा कोबा तातडीने काढण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी सांगितली.
अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह समितीच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई उपस्थित होते.
ते म्हणाले, मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम मुंबईच्या स्ट्रकवेल कंपनीकडून केले जात असून, त्यांनी रडार टेस्टिंगनंतर वरील अहवाल दिला आहे. ४०-५० वर्षांपूर्वी त्यावेळच्या लोकांना योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केला असेल.
या दगडी छतावर ५ फूट उंचीचे १ हजार टन कोबा-काँक्रिटीकरण केले आहे. शिवाय झाडांची मुळे मंदिर बांधणीचे नुकसान करत आहेत. ही स्थिती आता धोकादायक वळणावर असून, तातडीने हा कोबा काढणे गरजेचे आहे. हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अंमरजा निंबाळकर यांनी याबद्दलची तांत्रिक माहिती देत पुरातत्व विभागाकडे याचा प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊ, असे सांगितले.