धोकादायक वळणे ठरताहेत साक्षात मृत्यूचा सापळा
By admin | Published: April 22, 2015 09:47 PM2015-04-22T21:47:43+5:302015-04-23T00:57:34+5:30
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : अरुंद वळणांचे रुंदीकरण, तसेच धोकादायक पुलांचे बांधकाम करण्याची वाहनधारकांची मागणी
आंबा : तालुका ठिकाणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बहिरेवाडी पूल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठवड्यात या अरुंद पुलावरून कोसळणारी सँट्रो सुदैवाने वाचली. कोकण व घाट प्रदेशाला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील अरुंद वळणांचे रुंदीकरण व धोकादायक पुलांचे बांधकाम न झाल्याने आंबा विश्रामधामपुढील हसुकीचे वळण, तळवडे डी. पी.जवळील वळण, वालूरफाटा, निळे, बहिरेवाडी, केर्ली, वाघबीळ येथील वळणे अपघाताची केंद्रे बनली आहेत.
शाहूवाडीतील बहिरेवाडीचा पूल नेमका अरुंद वळणावर व दोन्ही बाजूने दरीच्या भागावर असल्याने येथे अपघात ठरलेले आहेतच. वरचेवर होणाऱ्या अपघातांमुळे पुलाचे गार्ड तुटून त्याची टोके रस्त्याच्या दिशेने वळली आहेत. सुमारे ५० फुटांच्या वक्राकार पुलावरून वाहन जाताना समोरील वाहन थांबवावे लागते. उतारावरून येणाऱ्या वाहनाला पुढचे वाहन क्रॉस होत असेल, तर बाजूपट्टी नसल्याने वाहन थेट पुलाच्या गार्डवरून थेट ५० फूट खोल कडेलोट होणे, हाच पर्याय राहतो. प्रशासनाने या वळणावरील पुलाचे रुंदीकरण करून दरीच्या भागावर सिमेंटचे संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी येथून एक किलोमीटरवरील करंजोशी गावाजवळील पुलावरून एस.टी. कोसळून नऊ प्रवासी ठार, तर
वीसजण जखमी झाले होते. त्या पुलापेक्षा हा बहिरेवाडीचा पूल अधिक धोकादायक असताना संबंधित अधिकारी या पुलाची दुरवस्था नजरेआड करीत आहेत.
प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पाहते का? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी या १४० किलोमीटर दरम्यान मलकापूर येथील शाळी नदीवरील पूल, भोसलेवाडी व तळवडे येथील पूल, धोपेश्वर फाट्यानजीकचा पूल, वारूळ येथील कडवी नदीवरील पुलांची उभारणी शंभर वर्षांपूर्वीची आहे.
बॉक्साईट खनिज, ऊस, कोकणातून येणारे लाकूड या वाहतुकीबरोबर, पवनचक्की, कोकण रेल्वे, जैतापूर प्रकल्प, दाभोळ व फिनोलेक्स प्रकल्पांची अवजड मशिनरी, शिवाय घाटावरून बाजारपेठांना जाणारा माल, भाविक-पर्यटकांचे वाढते प्रमाण पाहता या मार्गावरचे दळणवळण वाढले आहे.
सह्याद्रीचा घाटमाथा व अतिवृष्टीच्या टप्प्यातून हा रस्ता जात असल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती देणे गरजेचे आहे. सव्वाशे वर्षे होऊन गेलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे प्रस्ताव निधीअभावी धूळ खात पडले आहेत.
लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीसाठी निधी मिळवण्यास पाठपुरावा करावा, अशी शाहूवाडी-पन्हाळावासीयांची मागणी आहे.