पूरग्रस्तांच्या मदतीचा दापोली पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:53 AM2019-08-17T10:53:41+5:302019-08-17T10:56:58+5:30
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या अस्मानी संकटात लोकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ प्रचंड आहे. एका बाजूला दिलेल्या मदतीचे फोटो फेसबूकवर टाकून त्याची प्रसिद्धी केली जात असताना, अशा अनेक संस्था व व्यक्तीही आहेत, की त्यांनी केलेल्या मदतीचा कुठेही गवगवा केलेला नाही.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराच्या अस्मानी संकटात लोकांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ प्रचंड आहे. एका बाजूला दिलेल्या मदतीचे फोटो फेसबूकवर टाकून त्याची प्रसिद्धी केली जात असताना, अशा अनेक संस्था व व्यक्तीही आहेत, की त्यांनी केलेल्या मदतीचा कुठेही गवगवा केलेला नाही.
आरे (ता. करवीर) येथे रत्नागिरी जिल्ह्यांतील दापोली येथील १0 ते १२ लोक दोन दिवसांपूर्वी आले. त्यांनी फिरून गावाची माहिती घेतली. महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांची संख्या जाणून घेतली. गावात ३२ घरांचे मोठे नुकसान झाल्याचे समजल्यावर त्याची ग्रामपंचायतीकडून यादी घेऊन त्यांनी या प्रत्येक कुटुंबाला रोख चार हजार रुपयांची मदत घरोघरी जाऊन दिली. त्यांनी गावात कुठेही स्वत:चे नाव दिले नाही.
आपण कुठल्या संस्थेकडून आलो हेदेखील सांगितले नाही. त्यांच्यासोबत कोणताही फलक नव्हता. गावातील लोकांनी आग्रह करूनही त्यांनी आपला संपर्क नंबर दिला नाही. या गावाला मदतीची गरज असल्याचे ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त वाचून ते आले आणि मदत देऊन गेले.
म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू दिले नाही. हे एक उदाहरण असले, तरी अशा स्वरूपातील मदत अनेक ठिकाणांहून अनेक गावांना व व्यक्तिगत पातळीवरही झाली आहे, अजूनही सुरू आहे. त्याचा कुठेच बडेजाव केला जावा हे त्यांना आवडत नाही. या लोकांची मदत करण्याची भावनाच श्रेष्ठ आहे.
याउलट असेही काही लोक आहेत की ते ५00 रुपयांची मदत करून, पाच हजारांची प्रसिद्धी मिळवित आहेत. प्रसिद्धीसाठी का असेना लोक मदत करत आहेत, असा विचार करून काहीजण त्याकडे कानाडोळा करत आहेत; परंतु दिलेल्या मदतीबद्दल रोज फेसबूकवर माहिती शेअर करून त्यातून राजकीय फायदा मिळविण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. लोकांत त्याबद्दल नाराजीची भावना आहे.