अंबाबाई देवीचे दर्शन शनिवारी बंद राहणार, गरूड मंडप उतरवला; नवरात्रौत्सवनिमित्त मंदिराची स्वच्छता सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:58 PM2024-09-24T16:58:38+5:302024-09-24T16:59:26+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. गेल्या २३ वर्षांपासून आय स्मार्ट ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. गेल्या २३ वर्षांपासून आय स्मार्ट कंपनीच्यावतीने ही सेवा दिली जाते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मशीनरींचे पूजन झाले. शनिवारी (दि. २८) गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार असून त्या दिवशी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहील. मंदिर आवारातील गरूड मंडप उतरवण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. त्यावर प्रतिकृती रूपात मांडव उभारून नवरात्रौत्सवाचे विधी केले जातील.
नवरात्रौत्सव अवघ्या आठ दिवसांवर आल्याने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाई मंदिरातील तयारीला आता वेग आला आहे. मंदिर स्वच्छतेचे काम पुढील आठ दिवस चालेल. शनिवारी सरस्वती मंदिर येथे उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, बीव्हीजी तसेच रक्षक कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
कारंजा सुरू करण्याची मागणी
अंबाबाई मंदिर आवारातील कारंजा गेली काही वर्ष बंद असून नवरात्रौत्सवात तो पुन्हा सुरू करावा अशी मागणी व्हाइट आर्मी संस्थेने केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात उत्सव काळात महिलांसह लहान मुलेदेखील मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा असतो. मात्र कारंजामुळे परिसरातील वातावरण आल्हाददायक व प्रसन्न राहील, तरी कारंजा सुरू करावा असे म्हटले आहे.
मुख्य रांगेवर मांडव उभारणी
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाज्यातील मुख्य दर्शन रांगेवर मांडव उभारणीचे काम सध्या सुरू आहे. यासह बॅरिकेडस लावण्यात येत आहेत. ही रांग पुढे जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात येणार आहे.