Kolhapur: जोतिबाचे दर्शन उद्यापासून बंद, मूर्तीचे होणार संवर्धन; कलश व उत्सवमूर्ती दर्शनाची सोय
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 5, 2024 07:16 PM2024-07-05T19:16:48+5:302024-07-05T19:17:39+5:30
कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचे पुरातत्व विभागाच्यावतीने जतन संवर्धन केले जाणार आहे. त्यानिमित्त ...
कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचे पुरातत्व विभागाच्यावतीने जतन संवर्धन केले जाणार आहे. त्यानिमित्त देवाच्या मूळ मूर्तीचे दर्शन ७ ते ११ तारखेपर्यंत बंद राहील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली. भाविकांच्या सोयीसाठी उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
श्री जोतिबा देवाची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळविले होते. त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकासह अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. त्याबाबतच्या अहवालात मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे.
या अहवालावर कार्यवाही करत विभागाच्याचवतीने ७ ते ११ तारखेपर्यंत मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात देवाची उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.