कोल्हापूर: शिवाजी चौकातील महागणपतीचे दर्शन खुले, यंदा प्रथमच मोडली राजकीय टोलेबाजीची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:08 PM2022-09-01T12:08:00+5:302022-09-01T12:09:57+5:30
महागणपती आणि राजकीय टोलेबाजी हे गेल्या अनेक वर्षांपासून असणारे समीकरण यंदा प्रथमच मोडीत काढून मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणविरहित साधेपणाने उद्घाटन सोहळा आटोपला.
कोल्हापूर : गेल्या बेचाळीस वर्षांपासून २१ फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना करण्याची अखंडित परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाचा महागणपती बुधवारी रात्री भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. महागणपती आणि राजकीय टोलेबाजी हे गेल्या अनेक वर्षांपासून असणारे समीकरण यंदा प्रथमच मोडीत काढून मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणविरहित साधेपणाने उद्घाटन सोहळा आटोपला.
कोल्हापूर शहरातील ‘महागणपती’ हा प्रसिद्ध गणपती असून, या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते. बुधवारी रात्री साडेआठ वाजता हा गणपती दर्शनासाठी खुला करण्यात आला. त्यावेळी पाऊस असूनही हजारो भाविक रांगेत उभे होते. महागणपतीची मूर्ती बैठी, आकर्षक, देखणी आहे.
मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे यांनी महागणपतीची मूर्ती मंडळास दिली आहे; त्यामुळे त्यांच्याच हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू, उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांच्यासह भाग्येश लंगेरकर, राकेश वडणगेकर, सागर पोवार, अक्षय शिंदे, मंगेश जाधव, प्रफुल्ल भेंडे, दिलीप खोत उपस्थित होते.
नितीन पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी मंडळाच्या कार्याची माहिती सांगितली. महागणपतीसमोर राजकारणी मंडळी येत आणि नुसतीच राजकीय टोलेबाजी करून जात असत; पण आम्ही तरुणांनी ही पद्धत बंद करून ‘राजकारणविरहित उत्सव’ हा नवीन पायंडा पाडण्याचे ठरविले आहे, असेही त्यांनी सांगितले. देणगीदार सुहास भेंडे, मूर्तीला पुष्पहार देणारे महंमद पठाण, व्यंकटेश भेंडे यांचा नंदकुमार वळंजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.