दर्शन शहा खून खटल्याचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:12 PM2017-09-14T22:12:39+5:302017-09-14T22:15:57+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद, शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्याचा गुरुवारी झालेल्या सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला.
कोल्हापूर : देवकर पाणंद, शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्याचा गुरुवारी झालेल्या सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी संशयिताच्या वकिलांचे मुद्दे खोडून यावेळी युक्तिवाद केला. याची पुढील सुनावणी ९ आॅक्टोबर २०१७ रोजी होणार आहे. या सुनावणीत खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दर्शन शहा याचा देवकर पाणंद येथे २५ डिसेंबर २०१२ रोजीअपहरण करून खून झाला. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी योगेश ऊर्फ चांदणेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, तीन वर्र्षे जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्'ाचा खटला सुरू आहे. उज्ज्वल निकम यांनी, साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात सादर केल्या. याचबरोबर घटनास्थळावरून मिळालेले पुरावेही न्यायालयात सादर केले. संशयिताचे वकील अॅड. पीटर बारदेस्कर यांनी साक्षीदारांची उलटतपासणी करून बचावाचे मुद्दे मांडले. अखेर गुरुवारी सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. यावेळी बारदेस्कर यांनी, घटनास्थळावर मिळालेले संशयितांच्या शर्टचे बटण आणि दोरी यावर आक्षेप नोंदविले होते. बटणाला चिखल लागला होता, तर दोरीला चिखल लागला नव्हता, अशी नोंद पंचनाम्यात आहे. शेतात सापडलेल्या दोन्ही वस्तूंमध्ये फरक असल्याने त्यांनी पुराव्यांवर शंका उपस्थित केली.
यावर अॅड. उज्ज्वल निकम यांनी, शेताचा नकाशा सादर करून बटण आणि दोरी या दोन्ही वस्तू मिळालेली ठिकाणे स्पष्ट सांगून ती स्पष्ट केली. विहिरीजवळ चिखल होता, त्यामुळे बटण चिखलाने माखले, तर कोरड्या मातीत दोरी पडल्याने तिला चिखल लागला नव्हता असे सांगितले. यावेळी संशयित चारू चांदणे यालाही पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. यावेळी तपास अधिकारी यशवंत केडगे, दर्शनचे नातेवाईक उपस्थित होते.