अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 17, 2022 07:00 PM2022-09-17T19:00:40+5:302022-09-17T19:16:26+5:30
भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल
इंदुमती गणेश
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत येत्या बुधवारी (दि. २१) अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याने या दिवशी देवीचे दर्शन बंद राहिल. भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल. आज रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवाला आता फक्त आठ दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिरातील तयारीलाही वेग आला आहे. सध्या अंतर्गत मंदिर परिसराची स्वच्छता सुरू आहे. बुधवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येईल. या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक होईल. त्यानंतर मुळ मूर्तीला इरलं पांघरले जाईल. देवीची उत्सवमूती दर्शनासाठी सरस्वती मंदिराकडे ठेवण्यात येईल. गाभाऱ्याची स्वच्छता झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पून्हा मूर्तीला अभिषेक करून सालंकृत पूजा बांधण्यात येईल. तत्पूर्वी आज रविवारपासून शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.
सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता
बुधवारीच अंबाबाईच्या हिरेजडित व सोन्याच्या अलंकारांचीही स्वच्छता केली जाणार आहे. देवीचे नित्य व नैमित्तीक वापरातील दागिने वेगवेगळे असतात. तसेच उत्सवमूर्तीचे अलंकारही वेगळे आहेत. या अलंकारांची वर्षातून एकदा स्वच्छता केली जाते.