एकीच्या बळाने दसरा चौक तळपला
By admin | Published: October 16, 2016 12:11 AM2016-10-16T00:11:27+5:302016-10-16T00:11:27+5:30
सकल मराठा मोर्चा : ‘एक मराठा... लाख मराठा’ घोषणांचे लक्षवेधी फलक; मराठा अस्मितेचा सूर्य
कोल्हापूर : ‘एक मराठा... लाख मराठा’ अशी घोषणा लिहिलेल्या भगव्या टोप्या, हातात फडकणारा भगवा ध्वज, अंगावर निषेधाचा काळा टी शर्ट आणि न्याय्य मागण्यांचा हुंकार घेऊन कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठ्यांच्या अस्मितेचा सूर्य तळपला. जो परिसर राजर्षी शाहू महाराजांनी वसविलेल्या विविध जाती-धर्मांच्या वसतिगृहांनी पवित्र झाला आहे, त्याच मातीला साक्षी ठेवून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली. आम्ही आतापर्यंत शांत राहिलो म्हणून आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देतानाच समाजाच्या एकजुटीची वज्रमूठही आवळली. ही एकी मोर्चापुरती न ठेवता समाजाच्या सुख-दु:खात यापुढेही अशीच ठेवण्याची हाकही दिली गेली. कोल्हापूरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष होते, परंतु कोणतेही गालबोट न लागू देता अगदी शांततेतच कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासात जनसमुदायाचा कायम अबाधित राहील, असा विक्रम नोंदवीत हा मोर्चा दुपारी एक वाजता संपला.
कोल्हापूरची कोणतीही गोष्ट जगावेगळी असते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याचेच प्रत्यंतर मराठा मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा शनिवारी आले. एकदा मनावर घेतले तर मग देवालाही शरण जायचे नाही, ही विजिगीषू वृत्ती या मातीत उपजतच आहे. त्यामुळे मराठा मोर्चाला ‘यायला लागतंय’ अशी हाक समाजाने दिल्यावर कोल्हापूरचे समाजजीवन हादरून गेले. कोल्हापूर आणि इतर शहरांतील मोर्चामध्ये फरक हा होता की, कोल्हापूरच्या मोर्चाची घोषणा ७ सप्टेंबरला शेकापक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत झाली. त्यामुळे तेव्हापासून जवळपास सव्वा महिना वातावरण तापत गेले.
एवढा कालावधी अन्य जिल्ह्यांत तयारीसाठी मिळाला नव्हता. एखाद्या प्रश्नासाठी वातावरण कसे तापवायचे हे कोल्हापूरला कुणी सांगायची गरज नाही. टोलच्या आंदोलनाने हा ताजा धडाच घालून दिलेला होता. त्यामुळे तालमीच्या बैठका झाल्या, कोपरासभा झाल्या, गावे जागी झाली. महिला जाग्या झाल्या. तरुणाईमध्ये स्फुरण चढले. गाव असो की शहर सगळीकडे जनजागरणासाठी छोट्या-मोठ्या शेकडो बैठका झाल्या. गाड्यांवर ‘एक मराठा... लाख मराठा..’, ‘यायला लागतंय..’, ‘१५ आॅक्टोबर चलो कोल्हापूर’ अशी स्टिकर्स लागली. कोपऱ्या-कोपऱ्यांवर भगवे ध्वज फडकू लागले.
चौका-चौकांत डिजिटल झळकले. पिठाच्या गिरणीपासून गावच्या चावडीपर्यंत आणि सलूनच्या दुकानापासून ते सरकारी कार्यालयापर्यंत सगळीकडे गेला महिनाभर एक आणि एकच चर्चा सुरू राहिली ती म्हणजे मराठा मोर्चा. कोणत्याही मोर्चाचे कुणी तरी करायला लागते म्हणून संयोजन समितीने ते काम केले असले, तरी लोकच स्वत:हून पुढे सरसावले होते. त्यांना तुम्ही हे करा असे कुणालाच सांगायची गरज लागली नाही. ‘आमचे बापजादे लढले मातीसाठी... आम्ही लढू आता जातीसाठी’ असे भावनिक आवाहनही मने पेटवून गेले. अखेरचे दोन दिवस तर इतकी उत्कंठा शिगेस पोहोचली होती की, कधी एकदा शनिवार येतोय आणि त्यामध्ये आपण सहभागी होतोय, असे लोकांना झाले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत निम्मे कोल्हापूर रस्त्यांवरच होते. एवढे सगळे झाल्यावर मोर्चा अभूतपूर्व निघणार नाही तरच नवल..!
शनिवारचा सूर्य उगवला तोच भगवी किरणे घेऊन. सकाळी हलकी थंडी होती, काही भागांत धुकेही होते; परंतु शहराला जाग आली. उठलेला मावळा मोर्चाला जायच्या तयारीला लागला. सकाळी सात-सव्वासातच्या सुमारासच रस्ते चालू लागले. गाड्या येऊ लागल्या. शहराच्या वेशीवर नऊ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती. बघता-बघता पार्किंग फुल्ल झाले. शहराच्या चोहोबाजूंनी लोकांचे लोट पंचगंगेच्या महापुरासारखे वाहू लागले. साधारणत: नऊ ते दहापर्यंत तुलनेत लोकांचा ओघ कमी होता. कारण सकाळी गावांतून बाहेर पडून कोल्हापूरपर्यंत यायला काही कालावधी गेला.
दहानंतर मात्र मोर्चाच्या मार्गावर मुंगी शिरायलाही वाव नव्हता. लोक नुसते मूकपणे चालत होते. कोणतीही घोषणा नव्हती, की कुणाबद्दल राग-द्वेष, त्वेष नव्हता.
शाहूंच्या सावलीत शाहू...
मोर्चामध्ये छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चातील रणरागिणींची भाषणे सुरू झाली तेव्हा उन्हाचा तडाखा होता. त्यावेळी शाहू महाराज दसरा चौकातील मुख्य व्यासपीठावर राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून होते.
उपस्थित मान्यवर
मुख्य व्यासपीठ परिसरात महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, बेळगावच्या महापौर सरिता पाटील, आमदार संभाजी पाटील, संयोगीताराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, प्रा. जयंत पाटील, प्रा. मधुकर पाटील, फत्तेसिंह सावंत, डॉ. संदीप पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सकाळी सातपासून महिलांचे जथ्थे
मोर्चाचे केंद्र दसरा चौक असल्याने येथून चोहोबाजूंनी पाचशे मीटर परिसर महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून मोर्चासाठी महिला झुंडीने दसरा चौकात दाखल होत होत्या. भगव्या साड्या आणि डोक्यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ लिहिलेली भगवी टोपी घातलेल्या महिला, मराठा क्रांती मोर्चा लिहिलेले टी-शर्ट घातलेल्या तरुणी हातात भगवे झेंडे घेऊन दसरा चौकात दाखल होत होत्या.
मोर्चानंतर ‘सेल्फी’
मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला तो