Navratri -दसऱ्याची लगबग सुरू; बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:27 PM2019-10-05T14:27:45+5:302019-10-05T14:30:27+5:30
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफु्रट्स, फळे, आदी नानाविध वस्तूंची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफु्रट्स, फळे, आदी नानाविध वस्तूंची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.
आॅगस्ट महिन्यात पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना व व्यापाऱ्यांना महिनाभरापेक्षाही अधिकचा काळ लागला. त्यामुळे एकूणच बाजारपेठेवर मंदीचे सावट होते.
हे सावट विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात दूर झाले. त्यानंतर २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. या दोन्हींच्या एकत्रित प्रभावामुळे बाजारपेठेवरील मंदीचे सावट दूर होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाद्वार रोड, जोतिबा रोड, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, शाहूपुरीतील तयार कपड्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने व ड्रायफु्रट्स दुकाने व शहरातील विविध मॉल्समध्ये वस्तुखरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत.
विशेषत: मॉल्समध्ये खरेदीसाठी अधिक गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच शिवाजी स्टेडियम, उमा टॉकीज, शाहूपुरी, शिवाजी चौक, आदी भागांतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, आदींचे आगाऊ आरक्षण व विक्रीत वाढ झाली आहे. विशेषत: सोन्याचा दरही नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून उतरण्यास सुरुवात झाल्याने त्याच्याही खरेदीचा ओघ वाढला आहे.
प्रामुख्याने ब्रँडेड सोन्याच्या व्यापाऱ्यांसह गुजरी, भाऊसिंगजी रोड, आदी परिसरांतील पारंपरिक सराफी दुकानांवरही महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे खºया अर्थाने बाजारपेठेत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.