आचरा येथे दशावतारी महोत्सवास प्रारंभ
By admin | Published: September 11, 2014 09:38 PM2014-09-11T21:38:39+5:302014-09-11T23:11:02+5:30
रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सव
आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालू असणाऱ्या श्री रामेश्वर गणेशोत्सव समितीने आचऱ्यात ‘लोककला दशावतार’ नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. हा दशावतार महोत्सव रामेश्वर मंदिर आचरा येथे २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
या लोककला दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन रामेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त सदाशिव मिराशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गणेशोत्सव समिती कार्याध्यक्ष कपिल गुरव सचिव रवींद्र गुरव, विजय कदम, परेश सावंत, विकास गुरव, उदय बापर्डेकर आदी उपस्थित होते. नाट्य महोत्सवाची सुरुवात विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ (राठिवडे) सुतारवाडी यांच्या नाट्यप्रयोगाने करण्यात आली. या महोत्सवात जिल्ह्यातील नामांकित दशावतार नाट्यमंडळाने सहभाग घेतला आहे.
यात १३ रोजी श्री गणेश दशावतारी नाट्यमंडळ कडावल, १५ रोजी कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ नेरूर (बाबी कलिंगण प्रस्तुत), १७ रोजी आजगांवकर दशावतारी नाट्यमंडळ आजगांव (सावंतवाडी), १८ रोजी खानोलकर पारंपरिक मंडळ, १९ रोजी कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ नेरूर (सुधीर कलिंगण प्रस्तुत), २० सप्टेंबर रोजी चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ कवठी, २१ रोजी बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्यमंडळ कवठी, २२ रोजी पार्सेकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ वेंगुर्ला या मंडळानी सहभाग घेतला आहे तर २४ सप्टेंबर रोजी रात्री संयुक्त दशावतार होणार आहे. या स्पर्धेकरीता मंगेश टेमकर, बाबू परुळेकर, अभय भोसले, विजय कदम, कपिल गुरव, सचिन हडकर, जेरॉन फर्नांडिस व आचरा गावातील ग्रामस्थांनी काही देणगी स्वरूपात रोख रक्कम समितीकडे जमा केली आहे. दशावतार कलाप्रेमींनी महोत्सवात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)