‘विवेकानंद’समोर धिंगाणा ‘ट्रॅडिशनल डे’चे निमित्त : ‘ऋतुराजां’चे
By admin | Published: January 14, 2016 11:52 PM2016-01-14T23:52:48+5:302016-01-15T00:42:24+5:30
शक्तिप्रदर्शन; पोलिसांसमोरच डॉल्बी दणाणला, ढोल ताशा कडाडला
कोल्हापूर : ‘ट्रॅडिशनल डे’ चे औचित्य साधून ताराबाई पार्क येथील विवेकानंद महाविद्यालयाजवळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज व आमदार सतेज पाटील यांचा पुतण्या ऋतुराज संजय पाटील यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पोलिसांसमोर डॉल्बी व ढोल-ताशाच्या तालावर अक्षरश: धिंगाणा घातला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सध्या महाविद्यालयात पारंपरिक दिन व स्नेहसंमेलन सुरू आहे. गुरुवारी विवेकानंद महाविद्यालयाजवळ ऋतुराज क्षीरसागर यांच्या ‘नो मर्सी’ गु्रपने डॉल्बी, तर ऋतुराज पाटील यांच्या ‘आर. पी.’ग्रुपने ढोल-ताशा आणला होता. ‘नो मर्सी’चा डॉल्बी पाटबंधारे कॉलनीतून, तर जिल्हा परिषद कार्यालयाकडील रस्त्यावरुन ‘आर. पी. गु्रप’चा ढोल-ताशा येत होता. यामुळे या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहनांसह तरुणांमुळे पॅक झाल्या होत्या. ‘शांताबाई, शांताबाई’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एकच आमदार क्षीरसागर’, ‘शिवसेना-शिवसेना’ व ‘नो मर्सी’अशा गीतांवर तरुणाई थिरकली होती. ऋतुराज क्षीरसागर ‘नो मर्सी’चा ध्वज घेऊन नृत्य करीत होते. त्याचवेळी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून ‘आर. पी. गु्रप’चे ऋतुराज पाटील यांचे आगमन ‘नो मर्सी’च्या ग्रुपजवळ झाले. त्यावेळी कांहीक्षण वातावरण तणावपूर्ण बनले परंतू त्यावेळी क्षीरसागर व ऋतुराज पाटील या दोघांनी अलिंगन दिल्यावर जल्लोषाला पुन्हा उधाण आले. दोन्ही गु्रपमधील तरुणांनी डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य केले. त्यानंतर ऋतुराज पाटील हे आर. पी. गु्रपकडे गेले.
यावेळी क्षीरसागर यांचे समर्थक राहुल बंदोडे, जयवंत हारुगले, सुनील जाधव हे उघड्या जीपमध्ये बसून होते. त्यांच्यासोबत क्षीरसागर यांचे अंगरक्षकही तरुणांना सांभाळण्यासाठी थांबून होते. डॉल्बी महाविद्यालयाजवळ येताच तरुणांचा उत्साह वाढला. त्यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्त्य करत जल्लोष केला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ‘नो मर्सी ग्रुप’चे तरुण महाविद्यालय प्रवेशद्वारासमोरून पुढे गेले. काही वेळानंतर डॉल्बी बंद करण्यात आला व वातावरण शांत झाले.
पोलीस निरीक्षक
फिरकलेच नाहीत...
शहरात विविध महाविद्यालयात पारंपरिक दिनानिमित्त महाविद्यालयाबाहेर डॉल्बी आणून अक्षरश: तरुण धिंगाणा घालत आहेत. त्यावेळी पोलिसांनी डॉल्बी बंद करून कारवाईचा बडगा उगारला. पण, गुरुवारी विवेकानंद महाविद्यालयासमोर अशा प्रकारचा धिंगाणा सुरू होता. त्यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक व हाताच्या मोजण्याइतके कॉन्स्टेबल होते; परंतु, तेही हाताची घडी घालून हे पाहत होते. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी महाविद्यालय परिसरात फिरकलेच नाहीत. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनाकडे असल्याचे सांगण्यात आले; या प्रकाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.
‘नो मर्सी’चे समाजकार्यही
विवेकानंद महाविद्यालयातील ‘नो मर्सी गु्रप’ सामाजिक कार्यात कायमच पुढे असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर यांनी दिली. गु्रपतर्फे कुष्ठरुग्णांना ब्लँकेट, अंधशाळेस स्नेहभोजन, बालसंकुलास मदत, शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण यांसह ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा केला जातो. गु्रपच्या सदस्यांनी स्वखर्चातून पाच दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये पुष्कराज क्षीरसागर, अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, रोहन घोरपडे, हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, संदीप भोसले, आदींनी सहभाग घेतला.
पाच वर्षांपासून महाविद्यालयाने ट्रॅडिशनल डे बंद केला आहे. त्यामुळे गुरुवारच्या डे बाबत महाविद्यालयाचा काहीही संबध नाही. ती उनाड पोरं आहेत व महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत. यासाठी मुख्य प्रवेद्वारासह दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती. बुधवारी (दि.१३) महाविद्यालयाजवळ पारंपरिक दिनाचे फलक लावण्यात आले होते. याबाबत शाहूपुरी पोलिसांना कळविल्यानंतर हे फलक उतरविण्यात आले होते.
-डॉ. एच. बी. पाटील, प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर.