नृसिंहवाडीत आज साधेपणाने दत्त जन्मकाळ सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:36+5:302020-12-29T04:23:36+5:30
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात ...
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दत्तजयंती यात्रा रद्द केली असून धार्मिक कार्यक्रम मोजक्या मानकरी मंडळीच्या उपस्थितीत होणार आहे. दत्त भक्तांनी यावर्षी घरी राहूनच दत्तजयंती साजरी करावी, असे आवाहन दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी व सचिव गोपाळ अवधूत पुजारी यांनी केले.
दत्त जयंतीनिमित्त येथील दत्त मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, दुपारी ‘श्रीं’ची चरणकमलावर महापूजा त्यानंतर ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. त्यानंतर श्री नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल. ह. भ. प. हणमंतबुवा ग्रामोपाध्ये (रा. सांगली) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा होणार आहे. जन्मकाळानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे. रात्री आठनंतर धूप, दीप, आरती व पालखी सोहळा होऊन रात्री शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिरात कापडी मंडप, शामियाना, विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थानच्यावतीने केल्या असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
..............
सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातील श्रींच्या दर्शनासाठी व जन्मकाळ सोहळा श्री दत्त देवस्थानच्या युट्युब चॅनेलवर घरबसल्या पहावा, असे आवाहन दत्त देव संस्थानच्यावतीने केले आहे.
फोटो - २८१२२०२०-जेएवाय-०४-संग्रहित छायाचित्र.