नृसिंहवाडीत दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:23+5:302020-12-30T04:33:23+5:30
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती असल्याने कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत कोरोनाचे ...
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती असल्याने कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत कोरोनाचे नियम पाळत मंगळवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा साध्या पद्धतीने झाला. मंदिरात प्रवेश बंदी असल्याने भाविकांनी प्रवेशद्वारासमोरूनच दर्शन घेतले.
जयंतीनिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती व षोड्शोपचार पूजा, दुपारी श्रींच्या चरणकमलावर महापूजा झाली. त्यानंतर ब्रम्हवृंदामार्फत पवमान पंचसुक्त पठण करण्यात आले. श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. सायंकाळी पाच वाजता धार्मिक वातावरणात विधिवत श्री दत्तजन्मकाळ सोहळा झाला. यावेळी चांदीचा पाळणा विविध रंगांच्या फुलांनी सजविला होता. सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उपस्थित मानकरी मंडळींनी उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणागीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. रात्री मंदिरात धूप, दीप, आरती व पालखी सोहळा पार पडला.
दत्त जयंतीनिमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर येथील दत्तदेव संस्थान, कट्टा मंडळ, पुणे येथील शेखर शिंदे व परिवार आदी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसर फुलांची झुंबर, माळांनी सजविला होता. उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांच्या घरी ‘सुयोग सभागृहात’ जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला होता.
दत्त देव संस्थानचे विश्वस्त गुंडो पुजारी, विकास पुजारी, रामकृष्ण पुजारी, अमोल विभूते, महेश हावळे, मेघशाम पुजारी, श्रीकांत पुजारी तसेच स्वयंसेवकांनी, प्रशासन, पोलीस यंत्रणा, व्हाईट आर्मी, वजीर रेस्क्यू फोर्स तसेच दत्त देव संस्थान, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांनी नियोजन केले. यावेळी जन्मकाळ सोहळ्याचे चांगले नियोजन झाले, असे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी व सचिव गोपाळ अवधूत पुजारी यांनी सांगितले.
ठळक मुद्दे
* महाप्रसाद रद्द
* भजनी मंडळ नसल्याने सुने वातावरण
* भाविकांना प्रवेश पूर्णपणे नाकारण्यात आल्याने नाराजी; पण पोलीस व स्वयंसेवकांना सहकार्य
* मेवा-मिठाई, पेढे, बर्फी, बासुंदी, पूजा साहित्य, आदींची लाखोंची उलाढाल ठप्प
* पार्किंग ओस