दत्तवाड जि. प., दानोळी पं. स. पोटनिवडणूक रद्द?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:05+5:302021-08-25T04:29:05+5:30
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद आणि दानोळी पंचायत समिती पोटनिवडणूक जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. सभागृहाची मुदत ...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद आणि दानोळी पंचायत समिती पोटनिवडणूक जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर निवडणुका घेणे आवश्यक असते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही मुदत संपणार असल्याने निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही नसल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
जि. प. सदस्य प्रवीण माने यांचे निधन झाल्यामुळे दत्तवाड जि. प.ची जागा रिक्त आहे, तर दानोळी पंचायत समितीचे सदस्य सुरेश कांबळे यांचेही निधन झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. कोरोनामुळे सर्व निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सभागृहाची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपणार आहे. दरम्यान, दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समिती रिक्त जागेसाठी अनेकांनी तयारी केली होती. निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. सभागृहाची मुदत संपण्याअगोदर सहा महिन्यांपूर्वी निवडणुका होणे अपेक्षित असते. येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही मुदत संपणार आहे. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, सभागृहाची मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयारीचे काम सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्तच राहणार असून, सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांना तयारी करावी लागणार आहे.