दत्तवाड जि. प. पोटनिवडणूक कधी होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:41+5:302021-06-02T04:19:41+5:30
दत्तवाड : कोरोना महामारीमुळे स्थगित झालेली दत्तवाड जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक कधी होणार? याकडे दहा गावांतील राजकीय कार्यकर्ते, नागरिकांचे लक्ष ...
दत्तवाड : कोरोना महामारीमुळे स्थगित झालेली दत्तवाड जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक कधी होणार? याकडे दहा गावांतील राजकीय कार्यकर्ते, नागरिकांचे लक्ष लागले आहे. गेल्या दीड वर्षापासून ही जागा रिक्त आहे.
कोरोनामुळे सर्वच व्यवहार थांबले असले तरी देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या; तर महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूकदेखील पार पडली.
मात्र दत्तवाड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांचे निधन होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला, तरी ही जागा रिक्त असताना, येथील पोटनिवडणुकीकडे अधिकारी कोरोनाच्या महामारीचे कारण देऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
या जिल्हा परिषद मतदारसंघात हेरवाड, घोसरवाड, दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर ही गावे येतात. ही सर्व गावे महापूरग्रस्त असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच गावांत मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. मात्र तेथे सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद आवाज उठविण्यासाठी हक्काचा सदस्यच नसल्याने नागरिकांची कुचंबणा झाली आहे. सैनिक टाकळी येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे; तर राजापूर, घोसरवाड, नवे दानवाड या गावांत उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रातून काम करून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नसल्याने नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक कधी होणार, याकडे राजकीय कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागले आहे.