दत्तवाडमध्ये तंटामुक्त समिती निवडीतून एकीचे दर्शन

By admin | Published: October 9, 2015 12:13 AM2015-10-09T00:13:04+5:302015-10-09T00:38:41+5:30

राजकारण बाजूला : अध्यक्षपदाची निवड सलग नऊवेळा बिनविरोध करण्यात यश

Dattawad's one-member view | दत्तवाडमध्ये तंटामुक्त समिती निवडीतून एकीचे दर्शन

दत्तवाडमध्ये तंटामुक्त समिती निवडीतून एकीचे दर्शन

Next

गणपती कोळी--कुरुंदवाड दत्तवाड (ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बंडा माने यांची सलग नवव्यांदा बिनविरोध निवड झाली. एकीकडे अध्यक्ष निवडीवरून अनेक गावांत वाद निर्माण होत असतात. तसेच नुकत्याच झालेल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय ईर्ष्या पेटलेली असताना विरोधी आघाडीतील असूनही माने यांना पुन्हा अध्यक्षपदावर नियुक्त केल्याने विकासकामांत नेतेमंडळी व ग्रामस्थांचे राजकारणविरहित एकीचे दर्शन झाले आहे. हा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे.
गावात राजकीय ईर्ष्या मोठी. गावात अनेक गट-तट राजकारणात सक्रिय आहेत. तसेच जवळच कर्नाटकचा सीमाभाग असल्याने गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे, अशा परिस्थितीतही राज्यात आदर्शवत ठरेल, अशी गावातील तंटामुक्त समिती कार्यरत आहे. बंडा माने हे राष्ट्रीय कॉँग्रेसचे कार्यकर्ते असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजविली आहे. गावातील ज्येष्ठ व न्यायिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा असल्याने २००४ मध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यावेळेपासून आजतागायत प्रत्येकवर्षी ग्रामसभेत ग्रामस्थांबरोबर सर्वच राजकीय मंडळींनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने सलग नऊ वर्षे अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत माने व ‘स्वाभिमानी’चे आदिनाथ हेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली दत्तवाड ग्राम विकास आघाडी विरोधात भवानीसिंह घोरपडे (सरकार) व संताजी घोरपडे सरकार यांच्या राजर्षी शाहू पॅनेल यांच्यात लढत होऊन सरकारचे पॅनेल विजयी झाले. ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी दोन्ही आघाड्यांच्या नेतेमंडळींची राजकीय ईर्ष्या शिगेला पोहोचली होती. सरकार गटाची सत्ता आल्याने तंटामुक्त अध्यक्ष बदलतील, अशी शक्यता होती. मात्र, दोन्ही सरकारांनी सर्वच गटांच्या नेतेमंडळींची बैठक घेऊन व राजकारण बाजूला ठेवून या पदावर पुन्हा माने यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि राजकारणविरहित विकासकामे करण्यासाठी झालेल्या एकीचे दर्शन राज्यातच आदर्शवत ठरले आहे.


योजनाच वादाला कारणीभूत
गावातील तंटे गावातच मिटावेत व पोलीस, न्यायालयावरील कामाचा ताण कमी होऊन गावात शांतता नांदावी, नागरिकांत समजूतदारपणा वाढावा, या उद्देशाने सुमारे नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्तसमिती स्थापन केली. प्रारंभीच्या काळात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून अनेक गावांत वाद-विवादांबरोबर हाणामारीही होऊ लागली. त्यामुळे या निवडीच्या राजकारणावरून अनेक गावांत राजकीय कुरघोडीतून योजनाच वादाला कारणीभूत ठरू लागली.

Web Title: Dattawad's one-member view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.