करंबळीच्या माजी सैनिकाची मुलगी बनली हवाईसुंदरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:22 AM2021-04-05T04:22:30+5:302021-04-05T04:22:30+5:30
शिवानंद पाटील । गडहिंग्लज : हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवून माजी सैनिकाच्या मुलीने वडिलांसह गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले ...
शिवानंद पाटील ।
गडहिंग्लज
: हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवून माजी सैनिकाच्या मुलीने वडिलांसह गावाचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. त्या हवाईसुंदरीचे नाव आहे सुश्मिता रामगोंडा पाटील. करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील सेवानिवृत्त माजी सैनिक रामगोंडा शिवगोंडा पाटील यांची सुश्मिता ही मुलगी.
मुंबई येथील एका अकॅडमीमध्ये सुश्मिताने सहा महिन्यांचा एअर होस्टेजचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर विस्तारा एअरलाइन्समध्ये तिने मुलाखत दिली. मुलाखतीतून तिची विस्तारा एअरलाइन्स कंपनीमध्ये एअर होस्टेज पदावर निवड झाली. विस्तारा एअरलाइन्सचे प्राथमिक शिक्षण विशाखापट्टणम व मुंबईमध्ये, तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आजरा येथे पूर्ण केले. दहावीमध्ये ७७ टक्के गुण, तर बारावीमध्ये विज्ञान शाखेतून ६१ टक्के गुण मिळविले आहेत. सध्या तिने गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. सुश्मिताचे वडील २००९ मध्ये नेव्हीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. २०१२ पासून ते तलाठी म्हणून कार्यरत आहेत. वडील नेव्हीमध्ये कार्यरत असताना वडिलांबरोबर बालपणी सुश्मिताने विमानातून अनेकदा प्रवास केला. त्यामुळे तिनेही हवाईसुंदरी बनण्याचे ध्येय पाहिले होते. सुश्मिताच्या आई सुनंदा या गृहिणी आहेत. भाऊ शुभम हा बारावीमध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण घेत आहे.
-------------------------
*
गावच्या शिरपेचात आणखी एक तुरा
गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी हे नोकरदारांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील अनेकजण सैन्य व पोलीस दलात, शिक्षक, प्रशासकीय सेवेसह खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत. सुश्मितानेही हवाईसुंदरी बनून गावच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.
-------------------------
* सुस्मिता पाटील : ०४०४२०२१-गड-१०