Kolhapur: ..म्हणून सासू, सासऱ्याने एस.टी.तच आवळला जावयाचा गळा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:39 PM2024-09-27T12:39:35+5:302024-09-27T12:40:01+5:30

गडहिंग्लज-कोल्हापूर एसटीत कृत्य 

Daughter-in-law and mother-in-law to be killed for harassing daughter in kolhapur | Kolhapur: ..म्हणून सासू, सासऱ्याने एस.टी.तच आवळला जावयाचा गळा, दोघांना अटक

Kolhapur: ..म्हणून सासू, सासऱ्याने एस.टी.तच आवळला जावयाचा गळा, दोघांना अटक

कोल्हापूर : मुलीला वारंवार त्रास देत असल्याने सासरा आणि सावत्र सासूने ट्रॅक पँटच्या दोरीने गळा आवळून जावयाचा खून केला. गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीत कागलजवळ जावयाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर ठेवून त्यांनी पळ काढला. गुरुवारी (दि. २६) सकाळी खुनाचा प्रकार निदर्शनास येताच शाहूपुरी पोलिसांनी चार तासांत सासू आणि सासऱ्यास अटक केली.

संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत जावयाचे नाव आहे. हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (४८) आणि गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनगीनाळ, ता. गडहिंग्लज) असे अटकेतील सासू, सास-याचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातील एस.टी. प्रोव्हिजन स्टोअर्सच्या पायरीवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. दोरीने गळा आवळल्याचे व्रण दिसताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला.

मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या डायरीनुसार त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे स्पष्ट झाले. त्याच डायरीत त्याच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला. मोबाइलवर कॉल केल्यानंतर पत्नी गडहिंग्लज तालुक्यातील हुनगीनाळ येथे असल्याचे समजले. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मृतदेह ठेवणाऱ्या एका बाईचे आणि माणसाचे फुटेज मिळाले. शाहूपुरी पोलिसांनी हे फुटेज गडहिंग्लज पोलिसांना पाठवून पडताळणी करण्यासाठी सांगितले असता, ते संशयित मृताचे सासू, सासरे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

याचा बंदोबस्त करा..

संदीप शिरगावे हा ट्रकचालक होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी करुणा मुलाला घेऊन माहेरी गेली होती. चार दिवसांपूर्वी तो हुनगीनाळ येथे पत्नीकडे गेला. तिथेही तो त्रास देत असल्याने पत्नीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली. एक तर याचा बंदोबस्त करा, नाही तर मी आत्महत्या करते, असा निर्वाणीचा इशारा तिने दिल्याने तिच्या आई, वडिलांनी जावयाचा काटा काढण्याचा कट रचला. गुन्ह्यातील पत्नीच्या सहभागाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Daughter-in-law and mother-in-law to be killed for harassing daughter in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.