डॉक्टर्स आणि प्रशासनातील एकवाक्यतेमुळे कोरोनावर मात : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:58 PM2020-07-01T15:58:32+5:302020-07-01T15:59:49+5:30
कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले.
कोल्हापूर : कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने बुधवारी कोरोना योध्दा डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देसाई बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, डॉक्टर व प्रशासन एकत्र येऊन काम करण्याच्या कोल्हापूरच्या पॅटर्नने राज्यात व देशात एक नवा आदर्श घालून दिला आहे . कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती किंवा आता कोविड परिस्थिती असो, ती उत्कृष्टपणे हाताळण्यात सर्वप्रथम डॉक्टर्सनी धीर दिला त्याचबरोबर सहकार्य केले.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, महापालिकेच्या दवाखान्यांनी आता कात टाकली आहे. पंचगंगा, आयसोलेशन, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे अत्यंत अल्प दरात चांगले उपचार मिळत आहेत. याचा लाभ हजारो गरीब वंचित नागरिक घेत आहेत. कोल्हापूरला निरोगी बनवण्यासाठी डॉक्टर्स आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.
यावेळी मेडिकल असोसिएशन, सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर, मेन्स,रोटरी क्लब ऑफ गार्गीज व इनरव्हील क्लब ऑफ सनराइज यांच्यावतीने गौरव करण्यात आला. डॉक्टरांचा सांगितिक कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सादर करण्यात आला.