‘दौलत’चा आता होणार बाजारच
By admin | Published: January 31, 2016 01:23 AM2016-01-31T01:23:57+5:302016-01-31T01:23:57+5:30
मंगळवारी निविदा : ‘कुमुदा’ची एक कोटी बयाणा रक्कम जप्त
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्रीस देण्याबाबत मंगळवारी (दि. २) निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘कुमुदा’शी केलेला करार रद्द करीत, त्यांची एक कोटी बयाणा रक्कम जप्त करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी बॅँकेने ३ डिसेंबरला निविदा प्रसिद्ध केली होती. तिला अकरा जणांनी प्रतिसाद दिला. प्रत्येकी वीस हजार रुपये भरून निविदा फॉर्म खरेदी केले; पण विहित वेळेत केवळ ‘कुमुदा शुगर्स’ने एक कोटी बयाणा रक्कम भरून निविदा सादर केली. जिल्हा बॅँकेने एकूण देय रकमेपैकी दहा कोटी रोख व पंधरा कोटींची बॅँक गॅरंटी द्यावी. त्याचबरोबर १७३ कोटी ६१ लाख सुरक्षित देणी कोणत्या पद्धतीने व कशी देणार याचा तपशील बॅँकेकडे सादर करावा, असे सांगितले होते. ‘कुमुदा’ने कबूल केलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केलेली नाही. त्यांना दिलेला कालावधी संपल्याने त्यांच्याशी करार न करण्याचा निर्णय बॅँकेने घेतला आहे. कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे ६५ कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम वसूल झाल्याशिवाय बॅँकेला आर्थिक स्थैर्य मिळणार नाही. तसेच रिझर्व्ह बॅँकेला अपेक्षित असणारा नऊ टक्के सीआरएआर या वसुलीशिवाय करता येणार नाही. या बाबींचा विचार करता ‘दौलत’ कारखान्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. कारखाना चालविण्यास घेण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याने थेट विक्रीची निविदा काढण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. याबाबतची निविदा २ फेबु्रवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा बॅँकेचे अस्तित्व टिकविण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याबाबत टोकाचा निर्णय घेतला असून, मार्चअखेर कोणत्याही परिस्थितीत वसुली करणे हेच ध्येय राहणार आहे. बयाणा रक्कम म्हणून ‘कुमुदा’कडून घेतलेली एक कोटी रक्कम ‘दौलत’च्या खात्याला जमा करण्यात येणार आहे.
उद्या गडहिंग्लजमध्ये सनई-चौघडा
जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरोधात वसुली मोहीम जोरात उघडली आहे. कोल्हापूर शहर, शिरोळनंतर आता गडहिंग्लजमध्ये संचालकांनी मोर्चा वळविला असून उद्या, सोमवारी गडहिंग्लजमधील साने गुरुजी सेवकांची पतसंस्थेचे संस्थापक प्रा. किसन कुराडे, हिरण्यकेशी शेतीमाल प्रक्रिया संस्थेचे संस्थापक काळापगोळ यांच्या घरासमोर गांधीगिरी पद्धतीने वसुलीसाठी आंदोलन केले जाणार आहे.