‘दौलत’चा आज फैसला
By admin | Published: December 19, 2015 01:01 AM2015-12-19T01:01:33+5:302015-12-19T01:16:55+5:30
भाडे कराराची निविदा उघडणार : कुमुदा शुगर्स यांची एकमेव निविदा
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी दाखल झालेली निविदा आज, शनिवारी उघडण्यात येणार आहे. कुमुदा शुगर्स (बेळगाव) यांची एकमेव निविदा पात्र ठरल्याने निविदा उघडणार की तांत्रिक अडचण येणार, हे पाहावे लागणार आहे.
जिल्हा बँकेचे ‘दौलत’वर ६५ कोटींचे कर्ज आहे. या कर्जापोटी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी कुमुदा शुगर्स व चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने निविदा दाखल केल्या; पण चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने एक कोटी बयाणा रक्कम न भरल्याने त्यांची निविदा ग्राह्य मानली नाही. त्यामुळे कुमदा शुगर्सची एकमेव निविदा शिल्लक राहिली आहे.
जिल्हा बॅँकेच्या ६५ कोटींपैकी ५० टक्के तातडीने तर उर्वरित रक्कम दोन वर्षांच्या समान हप्त्याने भरण्याची महत्त्वपूर्ण अट निविदेत आहे. त्याशिवाय इतर देण्यांची जबाबदारीही भाडेकरूंना घ्यावी लागणार आहे.
जिल्हा बॅँकेच्या अटींची पूर्तता कुमुदा शुगर्स करणार का? यावरच ‘दौलत’चा फैसला होणार आहे. जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी समितीची बैठक शनिवारी आहे. त्यामध्ये ‘दौलत’ निविदा उघडणे हा विषय आहे; पण तांत्रिक अडचण आली नाही तरच निविदा उघडली जाऊ शकते. (प्रतिनिधी)