कोरडवाहू पिराचीवाडीत हरितक्रांतीची पहाट : कागल तालुका पश्चिम भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:59 PM2017-12-08T23:59:17+5:302017-12-09T00:01:15+5:30
म्हाकवे : कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर वसलेल्या पिराचीवाडी (ता. कागल) येथील अनेक पिढ्या कोरडवाहूपणाचा शिक्का घेऊनच जन्म घेत होत्या.
दत्तात्रय पाटील ।
म्हाकवे : कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावर वसलेल्या पिराचीवाडी (ता. कागल) येथील अनेक पिढ्या कोरडवाहूपणाचा शिक्का घेऊनच जन्म घेत होत्या. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांचा ‘हमाली’ हाच मुख्य व्यवसाय बनला होता; परंतु हमालांचे गाव अन् कोरडवाहूपणाचा शिक्का पुसून काढण्याचा निर्धार गहिनीनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेने केला आणि गावकºयांच्या स्वप्नवत असणारी पाणी योजना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पूर्ण केली. त्यामुळे कोरडवाहू गावात बागायती उसाचे मळे होऊन ‘हरितक्रांती’ची पहाट झाली आहे.
विशेष म्हणजे या योजनेसाठी गावातील एकाही शेतकºयाचा सातबारा गहाण न ठेवता संस्थेचे संस्थापक सुभाष भोसले या ‘जलदूता’ने आपली सर्व जमीन, सोने-नाणे, स्थावर मालमत्तेसह राहते घर बॅँकांकडे गहाण ठेवून तीन कोटींचा निधी उभा केला. त्यामुळे पहिल्याच वर्षी ३०० पैकी तब्बल २०० एकर जमीन ओलिताखाली येऊन गाव पाणीदार बनले आहे.
अनेक वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई होती. यासाठी शासनाने दोन पाण्याच्या योजना करून येथील पाणीप्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील दºया, डोंगरकपारी अशा भौगोलिक परिस्थितीमुळे शासनाच्या निधीसह ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वप्न डोंगर पायथ्याच्या पाण्यात बुडाले. त्यामुळे ही पाणी योजना करताना संस्थेच्या व्यवस्थापनासमोर फार मोठे आव्हान होते. खुदाईसाठी वनविभाग, तसेच पाणी उपसा परवाना, महावितरणकडून वीज परवाना मिळविण्याचेही संकट होते. तरीही गावकºयांना स्वावलंबी करायचेच या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या संस्थेने हे आव्हानात्मक ‘शिवधनुष्य’ उचलले.
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील दूधगंगा नदी ते पिराचीवाडी डोंगरमाथा हा ७ कि.मी.हून अधिक अंतराचा प्रवास करताना चार टप्प्यांत हे पाणी उचलले आहे.
या योजनेचे पाणी बारमाही फिरू लागल्याने येथील कूपनलिका, विहिरींसह गावतळ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे पिण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न कायमचाच निकाली निघाला आहे.
दरम्यान, या योजनेला अखंडित व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणच्या कसबा वाळवे सबस्टेशनमधून एक्स्प्रेस फिडरवरून स्वतंत्र जोडणी केली आहे.
हे तर आमच्यासाठी ‘जलदूत’च : गावकरी
पावसाच्या लहरीपणावरच आमची जिरायती शेती. भात, भुईमूग, तूर, आदी पिकांमधून फारसे उत्पन्नही मिळत नाही; परंतु सुभाष भोसले यांनी फार मोठे धाडस करून बारमाही वाहणाºया दूधगंगा नदीतून या डोंगरावर पाणी आणले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तहानलेली आमची शेत-शिवारं हिरवाईने नटली आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या शेतीचा पांग फिटला आहे. त्यामुळे ‘भोसले’ हे आमच्यासाठी ‘जलदूत’च ठरले आहेत, अशा कृतज्ञतेच्या भावना महादेव माने (वय ७७) व पांडुरंग डावरे (७८) या वयोवृद्धांसह गावकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
या भागाचा समावेश पांढºया पट्ट्यात झाल्याने येथे शेती पाणी उपसा योजनेस परवाना मिळत नव्हता. मात्र, गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून तत्कालीन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी खास बाब म्हणून प्रस्ताव दिल्याच्या अवघ्या तिसºया दिवशी या योजनेला परवाना मिळवून दिला. त्यामुळे या योजनेचा आणि गावकºयांचा प्रवास सुखकर झाला. बालपणापासून कोरडवाहूपणामुळे शेतकºयांचे बघितलेले हाल डोळ्यांसमोर होते. गावकºयांच्या जीवनात आर्थिक स्थिरता यावी यासाठी मोठ्या जिद्दीने कंबर कसली होती.
- सुभाष भोसले, सरपंच,
संस्थापक गहिनीनाथ पाणी योजना