पहिला दिवस - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:06+5:302021-09-25T04:23:06+5:30
कोरोनाच्या आधी दोन वर्षे अशाच संकटांनी दणाणून गेली. वादळ, तुफान पाऊस, महापूर, भूकंप अशा नैसर्गिक संकटांनी जग गांजून ...
कोरोनाच्या आधी दोन वर्षे अशाच संकटांनी दणाणून गेली. वादळ, तुफान पाऊस, महापूर, भूकंप अशा नैसर्गिक संकटांनी जग गांजून गेलं होतं. ते संपतंय न संपतंय तोवर हा महाकाळ लोटला. त्यानं तर दोन वर्षे हैदोस घातलाय. प्रत्येकाच्या काळजात भीती. हुरहूर. संसर्गानं तर घेऊन टाकलंय. समोरच्या माणसाबद्दल गैरविश्वास. ना नाती, ना माया. सारे नातेबंध तोडून टाकलेत. घरातल्या घरात कोरोनाचं वादळ. भयंकर-महाभयंकर. या विषाणूंची कोटी-कोटींची उत्पत्ती; पण दिसत नाही, कळत नाही, जाणवत नाही, उमगत नाही, अवगत नाही, पण बघता-बघता श्वास बंद करून टाकतो. माय-लेकीचं नातं असो, नाही तर बाप-लेकांचं असो, यांचं मायाममतेचं नातं उद्ध्वस्त करून टाकतो, घराघरांची ताटातूट करतो, अख्खी कुटुंबच्या कुटुंबं बघता-बघता वाऱ्याला लावतो, अग्नीच्या तोंडी लावतो. कोण कुणाशी बोलू शकत नाही. आईचं बाळ आईचं राहू शकत नाही. जग अजून पुरतं पाहिलं नसेल, अशा अजाण बाळाच्या किलकिल्या डोळ्यादेखत बिचाऱ्या आईला कोरोना होत्याची नव्हती करतो. अजून लग्नाची हळद निघाली नसेल, त्यावेळी नववधूच्या कपाळाचं कुंकू पुसलं जातं. होमाभोवती सात फेरे पूर्ण व्हायच्या आधी कपाळीच्या मुंडावळ्या ओरबडून नेल्या जातात. परिश्रमाने भला संसार उभा केलेला; पण अर्ध्या वाटेवर तो उधळला जातो. कोण साधू, कोण संत, कोण सम्राट, कोण अनेक देशांचे प्रतिपालक, पण मी अजिंक्य म्हणणाऱ्यांच्या डोळ्यासमोर चांदण्या नाचायला लावणारा हा क्रूरकर्मा कोरोना.
घर हाच बंदीखाना बनलाय. इकडं यायचं नाही, तिकडं जायचं नाही, देवळा-मंदिराकडं फिरकायचं नाही, उत्सव बंद, महोत्सव थंड. आयुष्यभराचा साथीदार करायचा, जोडायचा चार-चौघांच्याच साक्षीनं, व्हराड नाही की वरात नाही, कुस्तीचं मैदान नाही की वर्षाची यात्रा नाही, सणांचे सोहळे गुपचूप. कुणीही यावं, कुणीही जावं. याचा खेळखंडोबा झालाय. खुशालीनं जगताय? नाही. तसं निवांतपणानं जगणं आणायचं कुठून. पूर्वी मामाच्या गावी जायचं. मावशीच्या हावी पळायचं; पण आता गावं बंद, वेश बंद, गल्ली बंद, बोळ बंद, सारंच बंद.
उद्योदधंदे बंद, रोजगार बंद, उपासमार. काय खायचं, काय प्यायचं? जिवाची नुसती तडफड-तडफड. लेकराबाळांच्या इवल्याशा डोळ्यात किती कोवळे हळवे अश्रू! जिवांचा आकांत. कसं जगायचं? कसं जगायचं? आधारासाठी कुणाच्या तोंडाकडं बघायचं? घरातला आधार तुटला की अख्खं घर कोसळून जातं. सारं जगच उद्ध्वस्त. धीर द्यायला कुणाला उसंत. नात्यातला माणूस गेला की आत्महत्यांच्या किती करूण कहाण्या ऐकाव्या. काळीज थरारून जातं. डोळ्याला पाझर फुटतात.
आजचीच गोष्ट. आज ‘फादर्स डे’ एकाची पत्नी जिनं रात्रंदिवस नवऱ्याबरोबर राबून संसार उभा केला, ती या कोरोनानं नेली. पत्नीच्या मृत्यूचा जबरदस्त मानसिक धक्का नवऱ्याला बसला. आपल्या दोन तरुण मुलींसह गळफास घेऊन नवऱ्यानं आत्महत्या केली. आजच्या ‘आदर्स डे’नं हे हृदयद्रावक चित्र आपल्या काळजात उभं केलं. या अशा भयानक कोरोनानं अशी असंख्य घरं उद्ध्वस्त केलीत. गावांचा विध्वंस केलाय. कुणी कुणाला सावरायचं? कोरोनानं अनेक रुग्णांना देशोधडीला लावलंय. रुण मेला की त्याचं गाठोळं बांधतात. ते घरी न नेता परस्पर स्मशानात नेतात. अग्नी देणाऱ्यांच्या रांगेत ठेवतात. केव्हा क्रम लागेल तेव्हा पेटवायचा. ना कसले सोपस्कार, ना कुटुंबियांचे दर्शन. मृत रुग्णांची संख्या न सावरण्यासारखी. मग ती प्रेताची गाठोडी भरल्या नदीत फेकून देतात. ही भयानक असहाय्यता. किती भयंकर अगतिकता!
अशा गाठोड्यांचे पवीड नदीतिरी लागलेले असतात. अशी ही दैन्यावस्था या कोरोनानं केलेली आहे. सारे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. माणसाला लुळंपांगळं करून सोडले आहे.
भय, भीती माणसाला गांगरून टाकतेय. जिकडं-तिकडं ॲम्ब्युलन्सचे आवाज. नाना कठोर गोष्टींशी टक्कर देणारा माणूस हतबल झाला आहे. ती आवाज करणारी ॲम्ब्युलन्स नुसती नजरेस पडली, तरी धडकी भरते. लॉकडाऊनची नुसती जाणीव झाली, तरी माणूस हादरून जातो. काय करावं सूचत नाही. नको हे जगणं, असं वाटून जातं. मग आत्महत्या सूचतात. कशासाठी आणि कसं जगायचं, हे कळत नाही. आत्महत्याच्याच आत्महत्या!