पहिला दिवस - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:10+5:302021-09-25T04:23:10+5:30

लग्नाचे दिवस तर किती हौसेचं. गाड्या भरभरून आलेलं व्हराड, त्यांना गाववेसीवरनं वाजत गाजत आणणं, कधी लेझमाच्या खेळात लेझमानं खेळणं ...

Day 1 - Part 3 | पहिला दिवस - भाग ३

पहिला दिवस - भाग ३

Next

लग्नाचे दिवस तर किती हौसेचं. गाड्या भरभरून आलेलं व्हराड, त्यांना गाववेसीवरनं वाजत गाजत आणणं, कधी लेझमाच्या खेळात लेझमानं खेळणं किती हौसंचं. रात्री गावभरातल्या गल्ली-गल्लीतून मिरवत आणलेली वरात कधी संपूच नये असं वाटतं.

लग्नाचे दिवस म्हणजे नटण्याथटण्याचे दिवस. जत्रांचे दिवस, लग्नांचे दिवस म्हणजे उत्साहाचे. खुलून जाण्याचे दिवस. हे दिवस संपतात न संपतात तेवढ्यात आंब्या-फणसांचे दिवस सुरू होतात. डोंगरी मेवा तर केवढी ओढ लावणारा. जांभळांनी तोंड रंगवून टाकलेलं असायचं. आंबा चाखताना पिवळ्या आमरसानं कपडे पार पिवळटपणानं मरकटून गेलेली असतात. एरव्ही कपड्यांवर एवढा कसला तरी डाग दिसला तर घरभर राग भरून जातो; पण आंब्या-जांभळांच्या दिवसात मात्र माणसं घर भरभरून हसतील. थोरांची टिंगल टिवाळी तर पोरांची थट्टा मस्करी.

कुणाच्या झाडावर आंबे पिकले असतील तर त्यावर नजर चुकवून डल्ला मारायचा नी त्यांचं पिकवान आड बाजूला घालायचं. आंबा चोखताना चोरटी गोडी काळीज फुगवून टाकते. जंगलातही तोरणं, डोंबलं, चिकण्या, भोकरं, अळू या खाण्यानं किती सुखावून जाण्याचे दिवस! धन्य ती विद्यार्थी दशा!

अंगावरचे पडलेले डाग पुसता पुसता शाळेची आठवण होते. शिवारात औतं चाललेली. शिवारभर मामसं आणि औतं मुलांना हा देखावा फार फार आवडे. औतामागणं फिरणं कसं बरं वाटे. मशागत संपत आलेली असते नी त्याचवेळी शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊन उभा असतो. नवीन लग्न झालेल्या माघारणीचे पाठवणीचे दिवस असतात. नव्यानं लग्न झालेल्या नवऱ्या माहेरी निघालेल्या असतात. मनात हुरहुर. नव्या नवख्या वाटेनं माहेरी जाताना अनेक तर्हेचा आनंद मनावर रोमांच उठवितो. माहेरहून सासरला जाणाऱ्या नवतरुणीही शिदोरी समवेत चाललेल्या असतात. शिदोरीच्या हुर्ड्या बैलगाडीला बांधलेल्या असत. त्यांना बसणारे हेलकावे मुलांना बघावेसे वाटणारे असतात. वैशाख वणवा संपतो. वसंतोत्सव संपतो. पेरण्याचे दिवस जवळ येतात. त्याचवेळी मुलांना शाळेची ओढ लागते. शाळेच्या मुलांची ओढ लागते. तो स्वत:कडं पाहतो. ‘कपडे फाटायला आलेत. ढिगळं लावून चालेल का? नाही. एक-दोन महिनेच कसे तरी चालतील. नवीन घ्यायला हवेत. पैसे? बाबाचा रोजगार पोटापाण्यालाच पुरत नाही. मग? शाळेचा दिवस तर जवळ आलाय... बघू काढू कसे तरी... मामा येणार आहे. सांगू त्याला. करील कसं तरी काय तरी.

पुस्तकं? आपली गेल्या वर्षाची आहेत. जुनी पुस्तकं. तरी बरं. दुसऱ्याचेपेक्षा आपण आपली चांगली ठेवल्यात. जातील निम्यानं. आपण तरी कशाला घ्यायची नवी. जुनीच घेऊ. वह्यांचं घ्यायचं बघू. आई म्हणालीय. दोन कोंबडं विकू. तीन-चार डझन अंडी राखून ठेवलीत. त्यातनं काय भागतंय बघू?

Web Title: Day 1 - Part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.