‘१९ आॅगस्ट १९६५ चा तो दिवस’
By admin | Published: October 14, 2016 12:45 AM2016-10-14T00:45:09+5:302016-10-14T01:18:12+5:30
धडकी भरवणारा मोर्चा : महागाईविरोधात जनतेचा आक्रोश
कोल्हापूर : महागाई गगनाला भिडली, जनता संतापली, सारे शहर रस्त्यावर उतरले... गोळीबार झाला, सहाजण बळी पडले, खाराळा बाजारपेठ लुटली... अशी कोल्हापूरच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना अन् अलोट गर्दीचा निघालेला मोर्चा. १९ आॅगस्ट १९६५ चा तो दिवस होता. कोल्हापूर शहराची त्यावेळची लोकसंख्या अडीच लाखांच्या दरम्यान असताना सुमारे सव्वा ते दीड लाख जनता महागाई विरोधातील मोर्चात सहभागी झाली. आॅगस्ट १९६५ मध्ये आठ आणे किलोचा जोंधळ्याचा दर हा १० आणे झाला. त्यावेळी बाजारात ज्वारीची कृत्रिम भाववाढ झाली होती. भाववाढीच्या भडक्याने जनता संतापली होती. महागाईविरोधी प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाची हाक दिली. बिंदू चौकातून निघालेला अथांग मोर्चा मामलेदार कचेरी येथे पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व त्र्यं. सि. कारखानीस, डी. एस. नार्वेकर गुरुजी, कॉ. संतराम पाटील, कॉ. जीवनराव सावंत, कॉ. गोविंदराव पानसरे, के. बी. जगदाळे, पी. डी. दिघे, एम. के. जाधव, सखारामबापू खराडे, हिंदुराव साळोखे, विमलाताई बागल, आदींनी केले.
मोर्चा मामलेदार कचेरीवर पोहोचला. तोपर्यंत शहरात खाराळा (लक्ष्मीपुरी) धान्य बाजारपेठ लुटली. नागरिकांनी जीवनावश्यक म्हणजे कपडे, धान्यच लुटले. बिंदू चौक, लक्ष्मीपुरीत गोळीबार झाला त्यात सहाजण बळी पडले. कोल्हापुरात महागाई विरोधात छेडलेल्या आंदोलनाचा भडका त्यानंतरच संपूर्ण राज्यभर उडाला.
खासगी दुकाने लुटली नाहीत
आंदोलन महागाईविरोधी असले तरी लुटालूट ही फक्त जनता कंझ्युमर्सच्या रेशन दुकाने व कापड दुकानातच झाली. विशेष म्हणजे, लुटालुटीत नागरिकांनी कोणत्याही खासगी दुकानांची लूट केली नाही.
इचलकरंजीतही मोर्चा
कोल्हापूरच्या मोर्चापाठोपाठ इचलकरंजीतही विराट मोर्चा निघाला. के. एल. मलाबादे, शांताराम गरुड, भोजेमामा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. तेथेही असेच आंदोलन पेटले होते.
आंदोलनानंतर रेशनवर दहा प्रकारचे धान्य
मोर्चा निघण्यापूर्वी रेशन दुकानात फक्त मिलो आणि तांदूळ ही दोनच धान्ये मिळत होती. आंदोलनानंतर या दुकानात दहा वेगवेगळ्या प्रकारची धान्ये सर्वसामान्यांसाठी मिळू लागली.
टोलविरोधात शहरवासीयांचा ‘एल्गार’
कोल्हापूरचा माणूस पेटून उठला की, काय होऊ शकते हे साऱ्या महाराष्ट्राने ९ जानेवारी २०१२ ला पाहिले, अनुभवले. कोल्हापुरात खासगीकरणातून आयआरबी कंपनीने २२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यावरील टोलविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून त्यादिवशी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने ‘कोल्हापूर बंद’ आणि गांधी मैदानातून मोर्चाची हाक दिली होती. त्यासाठी जनजागरण म्हणून कृती समितीने
१५ दिवस शहरांतील गल्ली-बोळांतून छोट्या सभा घेतल्या. तालमीतील कार्यकर्त्यांची एकजूट केली. त्यांचे प्रबोधन करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी टोलविरोधात जनजागरण करणारे डिजिटल फलक लागले होते. आता जसे शहराच्या आणि जिल्ह्याच्या कोणत्याही कोपऱ्यात गेल्यास ‘एक मराठा...लाख मराठा...’ १५ आॅक्टोबरला घराला कुलूप लावून यायला लागतयं..’ ‘आमचे पिढीजादे लढले मातीसाठी...आमचा लढा जातीसाठी...’असे भावनिक आवाहन करणारे डिजिटल झळकले आहेत तसेच फलक त्यावेळी ‘नको स्थगिती... आम्हाला हवी टोलमुक्ती...’, ‘चला देऊया टोलला कोल्हापुरी टोला’ असे फलक लागले होते. घरापासून शाळेपर्यंत आणि कार्यालयापासून एस. टी. स्टँडपर्यंत ‘टोल नको’ हाच जोरदार प्रचार झाला. त्याचा मोठा परिणाम झाला. रिक्षाचालकांना टोल द्यावा लागणार नसतानाही त्यांनी ८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच ‘रिक्षा बंद’ आंदोलन केले. वकील, इंजिनिअर्स, उद्योजक, तालीम संस्था, विविध व्यावसायिक संस्था, पानपट्टीवाल्यापासून ते सरकारी नोकरदारापर्यंत सर्वजण टोलविरोधात रस्त्यावर उतरले. एरव्ही बंद असला तरी दुकाने बंद करा म्हणून फेरी काढावी लागते; परंतु या बंदवेळी दिवसभर शहरातील एक अन् एक दुकान बंद राहिले. चहा गाडीवालाही हातावरचे पोट असूनही टपरीस कुलूप घालून रस्त्यावर उतरला. ऐतिहासिक गांधी मैदानातून मोर्चाची सुरुवात होती. हे मैदान माणसांनी फुलून गेले. एखाद्या नागरी प्रश्नासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येण्याची ही गेल्या ५0 वर्षांतील कोल्हापूरचीच नव्हे, तर महाराष्ट्रातीलही पहिलीच वेळ होती. तुडुंब भरलेल्या पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह पुढे सरकावा तसा हा लोकशक्तीचा प्रवाह पुढे सरकत होता. टोल रद्द झाल्याशिवाय आता माघार नाही, हा निर्धार त्यांच्या प्रत्येक पावलांमध्ये होता. हा मोर्चा इतका प्रचंड यशस्वी झाला की, त्याने दिलेल्या ऊर्जेवरच कोल्हापूरचे टोलविरोधातील आंदोलन यशस्वी झाले आणि कोल्हापूर टोलमुक्त झाले.
ऊस, दूध दरासाठी लाखांचे मोर्चे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मोर्चे झाले, त्यामध्ये ऊस व दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या मोर्चांना बेदखल करता येणार नाही. सामान्य माणसांशी निगडित प्रश्न असल्याने या मोर्चांनी संपूर्ण जिल्हा ठप्प झाला होता. १४ वर्षांपूर्वी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेच्या माध्यमातून ऊस दराच्या आंदोलनाचे लोण जिल्ह्यात पसरले. त्यानंतर प्रत्येक वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लाखांचे मोर्चे व आंदोलने सुरू आहेत.
दूध दरासाठी १६ नोव्हेंबर २००६ ला भोगावती (ता. करवीर) येथे लाखो दूध उत्पादकांच्या उपस्थित दूध परिषद झाली. या परिषदेची दखल घेऊन सरकारने प्रतिलिटर दोन रुपये दर वाढ केली. त्यानंतर ऊस दरातील उर्वरित ३८० रुपयांसाठी खासदार राजू शेट्टी यांनी तब्बल १८० किलोमीटरची पदयात्रा काढली. यामध्ये ७० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. मे २०१० मध्ये पाण्याच्या क्रम बदलाविरोधात खासदार शेट्टी यांनी चांदोली धरणातून, तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत व प्रा. जालंदर पाटील यांनी राधानगरी धरणातून पाण्याच्या कावडी खांद्यावर घेऊन पाणी संघर्ष यात्रा काढली. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक घालून संघर्ष यात्रेची सांगता करण्यात आली होती.
शहीद सूर्यवंशीसाठी हजारोंचा जनसागर
काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेला शिवाजी पेठेतील वीर जवान अभिजित मदन सूर्यवंशी याच्या अंत्ययात्रेलाही लाखो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. शहरवासीयांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या वीर जवानाला अखेरचा सलाम केला. श्रीनगर-जम्मू मार्गावर बटवारा गेट परिसरात २५ डिसेंबर २००० ला पहाटे अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात तो शहीद झाला; परंतु त्याच्यावर ३० डिसेंबर २००० ला अंत्यसंस्कार झाले. अभिजितचे पार्थिव येणार असे समजल्यावर त्याच्या खरी कॉर्नर परिसरातील घराबरोबरच गांधी मैदानात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतील आबालवृद्ध अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. अंत्ययात्रेस इतका प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता की, आजपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेस एवढे लोक कधीच जमले नव्हते. अभिजित शहीद झाल्यापासून अंत्यसंस्कारांपर्यंत चार दिवस होते. त्यामुळे या काळात जनमानसात शहीद सूर्यवंशी याचीच चर्चा होती. परिणामी, कुणीही न बोलावता देशप्रेमाने भारावलेले कोल्हापूरकर अंत्ययात्रेवेळी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतले होते.
आंदोलनाची बिजे कोल्हापुरात
कोल्हापूर येथे १४ जुलै २०१६ मध्ये पहिली मराठा गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आणि रस्त्यांवर उतरून लढा देण्याचा निर्धार राज्यातील विविध मराठा संघटनांनी केला. सुमारे पाच तास चाललेल्या या परिषदेत मराठा समाजाचे आरक्षण, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, शेती, प्रथा-परंपरा, आदींबाबत विविध ठराव एकमताने करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाची बिजे या गोलमेज परिषदेत पेरली गेली.
१३ जुलैची दुर्देवी घटना
कोपर्डी (जि. अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ला एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी अमानुष अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. या प्रकरणी आरोपींंवर कारवाई होण्यासाठी पीडित कुंटुबीयासह ग्रामस्थ आक्रमक झाले. २० जुलैला कर्जत येथील विद्यार्थिनी याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या अन् घटनेचे कौर्य समोर आले.