दिन..दिन..दिवाळी
By Admin | Published: November 9, 2015 10:12 PM2015-11-09T22:12:59+5:302015-11-09T23:20:56+5:30
धनत्रयोदशी उत्साहात : आज पहिले अभ्यंगस्नान; घराघरांत उत्साह
कोल्हापूर : दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी, सुखाचे किरण आले दारी असे म्हणत घरोघरी आनंद, मांगल्य आणि सुखाची शिदोरी घेऊन येणाऱ्या दिवाळी सणाला सोमवारी धनत्रयोदशीने प्रारंभ झाला. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांनी सर्वांना आरोग्यसंपन्न जीवन प्रदान करणाऱ्या धन्वंतरी देवतेचे पूजन केले. महिलांनी धन्याची राशी करून श्री लक्ष्मीचे आवाहन केले; तर व्यावसायिकांनी नवी वही घालून व्यवसायाचा नवा लेखाजोखा मांडला.दिवाळीचा पहिला दिवस म्हणून धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून घरादारांत दिवे लावण्याला सुरुवात होते आणि पुढे पाच दिवस हा प्रकाशाचा उत्सव चालतो. संध्याकाळी कुटुंबात ऐश्वर्य, समृद्धीची बरसात करणाऱ्या श्री लक्ष्मीचे आवाहन केले जाते. यानिमित्त सुवासिनींनी धन्याची राशी करून श्री लक्ष्मीचे पूजन केले. आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी. त्यामुळे शहरातील लहान-मोठी रुग्णालये, औषधाच्या दुकानांमध्ये धन्वंतरीचे पूजन झाले. यादिवशी यमदीप दानसुद्धा करतात. कुटुंबात आरोग्य नांदावे व कुणाचाही अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी दक्षिण दिशेला दिवा लावण्याची प्रथा आहे.
आज नरकचतुर्दशी --दिवाळीतील अभ्यंग स्नानाचा दिवस असलेली नरकचतुर्दशी आज, मंगळवारी साजरी होत आहे. सर्वसामान्यपणे या दिवसापासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पहाटे दारात सडा-रांगोळी काढून विद्युत रोषणाई केली जाते. महिला कुटुंबातील पुरुषांना अभ्यंगस्नान घालतात आणि त्यांचे औक्षण करतात. त्यानंतर सगळे कुटुंबीय मिळून फराळाचा आस्वाद घेतात. त्यामुळे उत्सवाच्या पूर्वसंध्येला वासाचे साबण, तेल, उटणे यासह कपडे, आकाशकंदील, सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी महाद्वार रोडसह ताराबाई रोड, पापाची तिकटी, महापालिका, शिगोंशी मार्केट, लक्ष्मीपुरी या प्रमुख बाजारपेठांत नागरिकांची अलोट गर्दी होती.