दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

By admin | Published: April 6, 2016 12:33 AM2016-04-06T00:33:10+5:302016-04-06T00:33:58+5:30

महापौरांची प्रशासनास सूचना : आज सायंकाळी महापालिकेत बैठक; सावळा गोंधळ उघड

Day to day water sharing review | दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

Next

कोल्हापूर : दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना उपसा मात्र नेहमीप्रमाणेच होत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांसह महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचेही डोळे उघडले. त्यावर महापौर अश्विनी रामाणे यांनी तातडीने पाणीवाटपाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरास सुयोग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेत प्रमुख पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
कोल्हापूर शहरास १ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; तरीही नेहमीएवढाच पाणी उपसा आजही होत असल्यामुळे ‘दिवसाआडची मोट जमेना’या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त छापून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा हेतू साध्य होत नसल्याची बाब समोर आणली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व पदाधिकारीही चकित झाले. पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे महापौर रामाणे यांनी मंगळवारी तातडीने आयुक्त
पी. शिवशंकर यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि नियोजनात काही कमतरता असतील तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)


उपनगरात अपुरा पाणीपुरवठा
शहराच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होतो; तर उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याची कमतरता जाणवते; त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पाणीगळती काढण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. तरीही शहरातील गळती काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पाणीटंचाईच्या कामात प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये, असेही महापौर रामाणे यांनी म्हटले आहे.



नियोजनात त्रुटी
एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात त्रुटी असल्यामुळे काही भागांतील नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आजही उपनगरांत रात्री-अपरात्री आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. काही भागांत रात्री पाणी सोडले की ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते. गरज नसतानाही जादा पाणी देण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाणीवाटपाचे नियोजन चुकले असल्याची भावना बळावत आहे.



टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
शहरात ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी टॅँकरचा वापर होत आहे. महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे दोन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टॅँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना ओढाताण करावी लागत आहे. टॅँकरची प्रतीक्षा आणि तो येताच उडणारी धावपळ आता नागरिकांच्या अंगवळणी पडत आहे.

Web Title: Day to day water sharing review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.