दिवस-रात्र अवजड वाहनांची डोकेदुखी
By admin | Published: November 2, 2014 11:38 PM2014-11-02T23:38:29+5:302014-11-02T23:53:53+5:30
एकेरी रस्ता करा : शुक्रवार गेट पोलीस चौकी-शिवाजी पूल चिंचोळ््या रस्त्यावर शेकडो खड्डे
कोल्हापूर : दिवस-रात्र अवजड वाहने, त्यातच रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे व वाहतुकीसाठी अगदी चिंचोळा रस्ता, अशी स्थिती शुक्रवार गेट पोलीस चौकी ते शिवाजी पूल या रस्त्याची झाली आहे. हा रस्ता एकेरी (वन-वे) करावा व पापाची तिकटीपासून लोणार गल्लीमार्गे जुना बुधवारपेठ मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाने वाहने जावीत, अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा रस्ता गेली दहा वर्षे असाच आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
खड्ड्यात
गेलंय कोल्हापूर माझं !
या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी घराचे दार बंद केल्याशिवाय पर्याय नाही. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
- राजू कोरे, नागरिक.
सततच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची संपूर्ण धूळधाण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवणे अवघड आहे. महापालिका नवीन रस्ता कधी करणार या प्रतीक्षेत आहोत, तो लवकर व्हावा.
- शकुंतला मांगुरे, नागरिक.
नुसतेच पॅचवर्क
या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दहा वर्षांत नुसत्या पॅचवर्कशिवाय काही झालेले नाही. डांबर लागलेले कधीच बघितलेले नाही. सततच्या अवजड वाहनांमुळे ड्रेनेजच्या प्रश्नाबरोबर अंतर्गत जलवाहिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका नागरिकांकडून एकीकडे घरफाळ्याच्या माध्यमातून विविध कर घेते, पण कधी ड्रेनेजची पाईपलाईन बदलली नाही. त्यातच कोंडाळ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंबरडे मोडणारा रस्ता
शुक्रवार गेटपासून ते पंचगंगा नदी शिवाजी पुलापर्यंतच्या रस्त्याची हमखास कंबरडे मोडणारा म्हणून विशेष ओळख होत आहे. शिवाजी पूल ब्रह्मपुरी पिकनिक पॉर्इंट सेंटरजवळील रस्त्यावरच घरगुती जलवाहिनी वरती आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत अपघात होण्याचा धोका संभवतो. गेले कित्येक दिवस ही पाईपलाईन उघड्यावर पडली आहे. त्यामुळे कुठं रस्ता आहे हे समजतच नाही, असे नागरिक म्हणत आहेत.
२० लाख मंजूर, असे म्हणतात
या रोजच्या त्रासाला नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. नागरिक जेव्हा खराब रस्ता व अन्य प्रश्नांसाठी गेल्यावर महापालिका प्रशासन नुसती उडवाउडवीची उत्तरे देऊन ‘तुमच्या रस्त्याला २० लाख रुपये मंजूर’ झाले आहेत, असे थातुरमातुर उत्तरे देते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे सांगितल्यावर त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही दाद मागायची कोणाकडे, अशा भावना व्यक्त होत आहेत.