मतदानादिवशी ६१०० पोलीस, ६०० निमलष्करी दलाची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:31 AM2019-04-20T00:31:20+5:302019-04-20T00:31:25+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुमारे ६१०० पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, ...
कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुमारे ६१०० पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, याव्यतिरिक्त संवेदनशील केंद्रावर राज्य राखीव दल (एसआरपी) आणि केंद्रीय निमलष्करी दल (एसएएफ) ६०० जवान तैनात करण्यात येणार आहेत. हा सर्व बंदोबस्त २१ एप्रिलपासून नियुक्तीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार
आहे.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस बंदोबस्ताचे वाटप केले; यासाठी जिल्ह्यात ३३२१ मतदान बूथ, तर ५७ तात्पुरते बूथ राहणार आहेत. बूथच्या १८४२ इमारतीमध्ये १९९८ पोलीस कर्मचारी व १३२३ होमगार्ड बंदोबस्तासाठी राहणार आहेत. याशिवाय मतदान इमारतीच्या १०० मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी ४६२ अतिरिक्तपोलीस आहेत.
जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, १० उपअधीक्षक, ४० पोलीस निरीक्षक, १६० पोलीस उपनिरीक्षक, ५३०० पोलीस, १८०० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
संवेदनशील ठिकाणी एसआरपी, एसएपी सज्ज
संवेदनशील ठिकाणे, पैशांचा वापर होणे, आदी वादग्रस्त ठिकाणे निश्चित केली असून, त्यासाठी एसआयपी (राज्य राखीव दल)च्या तीन तुकड्या व एसएपी (केंद्रीय निमलष्करी दल) च्या तमीळनाडू स्पेशल आर्म फोर्स-१, मध्य प्रदेश स्पेशल आर्म फोर्स-२ तुकड्या मागविल्या आहेत. त्या आज, शनिवारी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. प्रत्येक तुकडीत १०० कर्मचारी अशी एकूण ६०० जवानांची संख्या आहे.
पेट्रोलिंगसाठी १०० अधिकारी
मतदानादिवशी जिल्ह्यात पेट्रोलिंगसाठी १०० अधिकारी नियुक्तकेले आहेत. तर २०० पोलीस कर्मचारी व २०० होमगार्ड तैनात आहेत. जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्याच्या अखत्यारित ३१ प्रभारी अधिकारी कार्यरत राहणार असून, ६२ पोलीस व ६२ होमगार्ड नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस संख्या
जिल्ह्यातील पोलीस : २८००
जिल्ह्याबाहेरील पोलीस : १५००
होमगार्ड : १८००
निमलष्करी दल : ६००
मतदानादिवशी वाहने सज्ज
पोलीस दल : १००
भाडेपट्टीवर : १००
एस. टी. बसेस : ३०
एसआरपी, एसएपीसाठी वाहने : नऊ आरामबस, सहा ट्रक, सहा सुमो.