दिव्यांगांंच्या लसीकरणासाठी राखीव दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:19+5:302021-05-29T04:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लसीकरणावेळी दिव्यांगांना अनंत अडचणी येत असल्यामुळे त्यांच्यासाठी आठवडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लसीकरणावेळी दिव्यांगांना अनंत अडचणी येत असल्यामुळे त्यांच्यासाठी आठवडा किंवा पंधरवड्यातून एक दिवस राखीव ठेवावा, अशा सूचना सामाजिक न्याय विभागाने केल्या आहेत. तसेच यासाठी प्रत्येक तालुक्याला समन्वय अधिकारी नेमावा, असेही याबाबतच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये दिव्यांगांना लसीकरण करून घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर लस कधी येणार, हे माहिती नसते. तेथे गेल्यावर रांगा असतात. यावेळी भर उन्हात थांबावे लागते. एवढे करूनही लस मिळेलच, याची खात्री नाही, अशा सर्व तक्रारी सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेत दिव्यांगांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र दिवस आणि समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा. त्यांनी लसीकरण यंत्रणेशी संपर्क साधून आठवडा किंवा पंधरवड्यातून एक दिवस राखीव ठेवावा, प्रत्येक तालुक्यासाठी दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी दोन किंवा अधिक समन्वय अधिकारी नेमावेत.
जे दिव्यांग विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी समन्वय अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर आधारकार्ड व युडीआयडी कार्डची माहिती पाठविण्याचे आवाहन करावे. ही माहिती प्राप्त झाल्यावर संबंधितांना लसीकरण केंद्र व त्याचे ठिकाण अवगत करावे.
चौकट
समन्वय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना
दिव्यांगांच्या लसीकरणावेळी समन्वय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण करून घ्यायचे आहे. त्याआधी राखीव तारीख, वार व लसीकरण केंद्राचे ठिकाण याबद्दलची प्रसिध्दी अधिकाऱ्यांनी विविध माध्यमातून करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
राज्यातील नोंद दिव्यांगांची संख्या ३ लाख ९५ हजार ७९४
४५ वर्षांवरील दिव्यांग १ लाख ४० हजार ५६९