‘डीबी’त रुबाब मारणाऱ्यांची होणार उचलबांगडी
By Admin | Published: February 13, 2017 12:35 AM2017-02-13T00:35:30+5:302017-02-13T00:35:30+5:30
राणे चौकशी अधिकारी : चारही पोलिस ठाण्यांमधील माहिती मागविली
एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डिटेक्शन ब्रँच- डीबी पथक) आहे. या पथकात काम करणारे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यांची उकल न करता स्वत:चे हित जपत रुबाब मिरविण्याचे काम करताना दिसतात. अंगामध्ये कडक इस्त्रीचे कपडे, पायांमध्ये किमती बूट, तर डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल अशा पोशाखात वावरणारे ‘डीबी’ पथक वादग्रस्त ठरत आहे. या पथकाची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याची कुंडली मागविली आहे. त्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. लवकरच ‘डीबी’च्या रुबाबदार पोलिसांची तेथून उचलबांगडी होणार आहे.
या पथकामध्ये प्रशिक्षण घेऊन, अंगातील कौशल्य दाखवून नियुक्ती व्हावी, अशी नियमावली आहे. आजकाल शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यापेक्षा ज्याचे राजकीय हितसंबंध चांगले, त्याचीच वर्णी या जागी लागते. पदासाठी आवश्यक असणारे गुण, सांकेतिक भाषा, गुन्हे शोधून काढण्यासाठीची दूरदृष्टी, बोलण्यातील लकब, आरोपीच्या मनातील भाव जाणून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याची धमक यापैकी एकही गुण आताच्या ‘डीबी’ पथकातील पोलिसांच्या अंगी नाही. वशिल्यावर आलेले हे पोलिस आपला वशिला चालू ठेवण्यासाठी गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात अशा तक्रारी आहेत. या पथकातील पोलिसांची झाडाझडती घेण्याचा पोलिस अधीक्षकांनी दिलेला आदेश हा त्याचाच एक परिणाम आहे.
जिल्ह्यात मटका, जुगार, बेकायदेशीर गॅस भरणा यांसह अवैध धंदे जोमाने सुरू झाले. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. पोलिस ठाण्यातील डीबी पथकाची ओळख ‘पैसे मिळविणारे पथक’ म्हणूनच पुढे आली. या अवैध व्यावसायिकांवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. या वृत्ताची दखल घेत पोलिस अधीक्षक तांबडे यांनी या पथकाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक राणे यांनी शहरातील चार पोलिस ठाण्यांतील डीबी पथकांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती मागविली आहे. ते किती वर्षांपासून काम करतात, आजअखेर त्यांनी कोणती कामगिरी केली याची पडताळणी केली जात आहे. हा चौकशी अहवाल राणे हे अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना सादर करणार आहेत. त्यानंतर कामचुकार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक घेणार आहेत.