मृत अमोल पोवार जिवंत

By admin | Published: March 10, 2016 01:30 AM2016-03-10T01:30:37+5:302016-03-10T01:31:14+5:30

केरळमध्ये पकडले : भावासह तिघांना अटक; कर्जमुक्तीसाठी जळित कारचा बनाव केल्याचे उघड

Dead alive | मृत अमोल पोवार जिवंत

मृत अमोल पोवार जिवंत

Next

कोल्हापूर : आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह या गुंतागुंतीच्या प्रकरणाचे गूढ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उकलले. स्वत:च्या अपघाताचा बनाव करून पसार झालेला बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (वय ४२, रा. अपराध कॉलनी, साने गुरुजी वसाहत) याला पोलिसांनी कोची-केरळ येथे जिवंत पकडले. या कटामध्ये सहभागी असलेला त्याचा भाऊ विनायक पोवार याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १४ कोटी रुपयांच्या कर्जातून मुक्तता मिळविण्यासाठी तसेच विम्याचे पैसे मिळविण्याच्या हेतूने बनाव केल्याची कबुली अमोल पोवार याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक कृपासिंधू डेव्हलपर्सचे अमोल पोवार यांच्या मालकीची कार आय-२० कार पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मोरीखाली आढळली होती. चालकाच्या जागेवरील मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी अमोल पोवार याचे मतदान ओळखपत्र मिळून आले. तसेच जळालेली कार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पोवार यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अमोल पोवार याचा अपघाती मृत्यू की घातपात, अशी चर्चा सर्वत्र होती.
ढेकणेच्या बनावाची आठवण
स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील सेंट्रिंग कामगार दत्तात्रय पांडुरंग नायकुडे (वय ४५) यांना दारू पाजून त्यांचा निर्घृण खून करून स्वत:चा खून झाल्याचा बनाव कुख्यात गुंड लहू ढेकणे याने केला होता. ही घटना ताजी असतानाच बांधकाम व्यावसायिकाने स्वत:च्या अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचे कोल्हापूर पोलिसांनी उघडकीस आणले. वर्षभरात अशा प्रकारच्या बनावाची ही दुसरी घटना आहे.


बांधकाम व्यवसायात १४ कोटींचे कर्ज
बांधकाम व्यावसायिक अमोल याने ‘कृपासिंधू डेव्हलपर्स’च्या नावाखाली विविध ठिकाणी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी त्याने विविध बँकांमधून सुमारे १४ कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. त्याचबरोबर एकाच फ्लॅटची चार-चार ग्राहकांना विक्री करून त्यांच्याकडून पैसे उकळले. आर्थिक अडचणीमध्ये सापडल्याने बँकांसह नागरिकांनीही त्याच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. साने गुरुजी वसाहतीतील अपराध कॉलनीतील बंगल्यात तो पत्नी व दोन मुलांसह राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो या बंगल्याकडे फिरकलाच नव्हता. तो केरळमधील कोची येथे लपल्याची माहिती त्याचा भाऊ विनायक याने दिली. त्यानुसार दोन पोलिस अधिकारी व चार कॉन्स्टेबल तातडीने रवाना झाले. तेथे जाऊन त्यांनी अमोलच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी पहाटे हे पथक कोल्हापुरात आले.
खून झालेली निष्पाप व्यक्ती लमाणी कामगार
खून झालेली निष्पाप व्यक्ती ही कर्नाटकातील लमाणी कामगार असल्याचे तपासात पुढे येत आहे. या कटात आणखी कोणी आहे का? यासंबंधी त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आज, गुरुवारी करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अआजरा जळित कार प्रकरणसा झाला पर्दाफाश
ज्या ठिकाणी कार जळालेल्या अवस्थेत मृतदेहासह सापडली ते संपूर्ण दृश्य संशयास्पद असल्याने पोलिसांनी जळालेल्या मृतदेहाची हाडे पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविली. पोलिसांना घटनास्थळी कॅन सापडले. त्यामधून डिझेलचा वास येत होता. त्यामुळे संशय जास्तच बळावला. घटनास्थळी घड्याळ व अन्य काही वस्तू सापडल्या होत्या. त्या अमोलच्या नव्हेत, असे त्याच्या पत्नीने सांगितले होते. त्याची पत्नी, भाऊ यांच्याकडे चौकशीत विसंगत माहिती मिळत होती. घटनेपूर्वी अमोल हा एका लॉजवर चार दिवस थांबल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. खबऱ्याकडूनही तो जिवंत असल्याची माहिती मिळाली होती. अमोल याचा मोबाईलही बंद होता. घटनेपूर्वीचे त्याचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले असता भाऊ विनायक याच्याशी त्याचा वारंवार संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यानुसार सात दिवसांपूर्वी साने गुरुजी वसाहतीमध्ये राहत असलेल्या घरातून भाऊ विनायक याला ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अमोल जिवंत असून त्याच्या मृत्यूचा बनाव केल्याची कबुली दिली.

Web Title: Dead alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.