तेरवाड बंधाऱ्यात मृत माशांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:16 AM2018-10-22T00:16:52+5:302018-10-22T00:16:57+5:30
कुरुंदवाड : पंचगंगा नदीत काळेकुट्ट दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत पावत असून, तेरवाड बंधाºयाला मृत माशांचा खच पडला आहे. ...
कुरुंदवाड : पंचगंगा नदीत काळेकुट्ट दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत पावत असून, तेरवाड बंधाºयाला मृत माशांचा खच पडला आहे. दूषित पाणी आणि मृत माशामुळे नदीकाठी उग्र वास येत असून, ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीला पंचगंगाकाठच्या नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगा नदीला उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी दूषित पाण्याचा प्रश्न भेडसावतो. थंडावलेला पाण्याचा प्रवाह त्यातच कोल्हापूरपासून इचलकरंजी शहरापर्यंत विविध शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत पावण्याचे प्रमाण वाढते.
मात्र, यंदा ऐन हिवाळ्याच्या प्रारंभीच ही समस्या निर्माण झाली आहे. नदीपात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याबरोबर इचलकरंजी शहरातील औद्योगिकीकरणाचे व शहरातील सांडपाणी मिसळत असल्याने पाणी काळेकुट्ट आले असून, उग्र वास येत आहे. तेरवाड बंधाºयातून पाणी बाहेर पडताना फेसाळत आहे.
दूषित व रसायनयुक्त सांडपाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असून, तेरवाड बंधारा व नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, उन्हाळ्यात ही समस्या अधिकच भेडसावणार असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा शिरोळ तालुक्यातून जल आंदोलन भडकण्याची शक्यता आहे.