पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:42 PM2019-01-06T23:42:15+5:302019-01-06T23:42:20+5:30
कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत ...
कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हास
पाटील यांचा पंचगंगा नदी संगम ते उगम जागर पदयात्रा सुरू असताना या
प्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी जागर आंदोलन काळातच नदी प्रदूषणाचा प्रश्न तीव्र झाल्याने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगा नदी शिरोळ-हातकणंगले तालुक्याला वरदान ठरली आहे. मात्र, या नदीमध्ये कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी ही गटारगंगा बनली आहे. नदी प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे.
प्रदूषित पाण्यामुळे शेतीबरोबर माणसांच्या आरोग्यावरही विपरीत
परिणाम होत असल्याने गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पंचगंगा काठावरील
विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी प्रदूषणविरोधी आंदोलन केले. मात्र, आंदोलकांचा आंदोलनातील
सातत्याचा अभाव, राजकीय पाठबळाचा अभाव, प्रदूषण नियंत्रण मंडळांचे औद्योगिक कारखान्याशी असलेले लागेबांधे, आदी कारणामुळे
प्रदूषण मंडळाच्या नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जुजबी कारवाईमुळे
हा नदी प्रदूषण प्रश्न दिवसेंदिवस वाढतच गेला.
नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा. त्यासाठी ठोस निर्णय व अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी शुक्रवारपासून सोमवारअखेर कुरुंदवाड येथील
पंचगंगेचा संगम ते प्रयाग चिखली येथील उगमापर्यंत जागर पदयात्रा काढली आहे. कृषीभूषण बुधाजीराव मुळीक, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहभागाने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या प्रतिसादामुळे पदयात्रा गाजत आहेत. या प्रश्नाला राजकीय ताकद लागल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता नागरिकांत मानली जात असताना आंदोलन काळात पंचगंगा पुन्हा दूषित पाण्याने ग्रासली आहे.