kolhapur news: उदगावला कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, मासे गोळा करायला नागरिकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:00 IST2023-03-10T15:59:54+5:302023-03-10T16:00:24+5:30
प्रदुषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा

kolhapur news: उदगावला कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, मासे गोळा करायला नागरिकांची झुंबड
निनाद मिरजे
उदगाव: उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रात पुलाजवळ मृत माशांचा खच पडल्याचे आज, शुक्रवारी दिसून आले. हे मासे पकडण्यासाठी याठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नदीपात्रात रसायनमिश्रीत काळेकुट्ट पाणी दाखल झाले आहे. त्यातच मासे मृत्युमुखी पडत आहेत. नदी प्रदुषणामुळे जयसिंगपूर, उदगाव, शिरोळसह कृष्णा नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, नदीपात्रात मृत झालेले मासे खाण्यासाठी धोकादायक असल्याने ते खाऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. याचा फायदा नदी प्रदुषण करणाऱ्या घटकांनी घेतला आहे. शुक्रवारी सकाळी उदगाव-अंकली दरम्यानच्या पुलाजवळ मृत माशांचा खच लागला होता.
काळेकुट्ट दुषित पाणी दिसून येत होते. नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणी योजनांचा पाणी उपसा कृष्णा नदीवरुन आहे. त्यामुळे प्रदुषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांतून होत आहे.