स्मशानभूमींची मरणासन्न अवस्था
By admin | Published: January 15, 2016 11:31 PM2016-01-15T23:31:50+5:302016-01-16T00:53:29+5:30
गगनबावडा तालुका : आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव
चंद्रकांत पाटील -- गगनबावडा--जीवनभर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या मानवाला किमान मरण तरी चांगले यावे, अशी अपेक्षा असते; परंतु कित्येक ठिकाणच्या स्मशानभूमीत आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मृतदेहांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.गगनबावडा तालुक्यात तालुक्याच्या निर्मितीपासून बहुतांश स्मशानभूमींची ‘जैसे थे’ अवस्था आहे. काही तुरळक गावांत शासनाचा निधी खर्च करून स्मशानशेड बांधण्यात आले आहेत; परंतु त्यांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमींच्या जमिनी खासगी मालकीच्या आहेत. खासगी मालकीत असलेल्या या जागा शक्यतो नदीकाठाला आहेत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत; परंतु या सर्व स्मशानभूमींची वाताहत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते व पायवाटा या खासगी मालकीच्या आहेत. शेतीच्या दिवसात एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीपर्यंत पोहोचताना ग्रमस्थांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटा ग्रामपंचायतींच्या मालकीच्या असाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात आहे; परंतु शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या वाट्याला मरणानंतरही वाईट यातना येत आहेत.पर्यटनाच्यादृष्टीने कितीही गाजावाजा केला जात असला तरी स्मशानभूमी हा महत्त्वाचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. स्थानिक पदाधिकारी व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमी व सुशोभीकरण होण्याच्यादृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा निधी या कामासाठी खर्च करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाणीटंचाईचाही फटका
तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी या घनदाट राई व काटेरी झाडाझुडपांत आहेत. मृतदेहांबरोबर आलेल्या व्यक्तींना काट्यातून मार्ग काढावा लागतो. त्याचप्रमाणे मृतदेहाच्या सर्व विधी पार पडेपर्यंत इतरांना स्मशानभूमी शेजारीच ताटकळत उभे राहावे लागते. काही ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने उन्हाचा त्रास, तसेच विधीवेळी लागणारे पाणी जवळपास नसल्याने काहीवेळा घराकडून पाणी घेऊन जावे लागते. या सर्व अडचणी प्रत्येकवेळी लोकांना भेडसावत आहेत.