अकरावीचा अर्ज भरण्यास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 06:40 PM2020-08-22T18:40:52+5:302020-08-22T18:42:26+5:30
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल झाला आहे.
कोल्हापूर : नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल झाला आहे.
शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुदत रविवार (दि. २३) पर्यंत होती. मात्र, कोरोना, संभाव्य महापूरजन्य परिस्थितीमुळे अद्याप सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी भाग दोनमधील शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्य क्रम दिलेला नाही.
त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रवेश समितीने अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे, अशी माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील भाग एकमध्ये नोंदणी केली आहे, त्यांनी भाग दोनसाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांनी भाग दोन भरला आहे. त्यांनी ते पुन्हा भरण्याची गरज नाही.
बदललेले वेळापत्रक
१) अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुदत : ३० ऑगस्ट
२) निवड यादी तयार करणे : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
३) निवड यादीची प्रसिद्धी : ५ सप्टेंबर
४) तक्रार निराकारणाची मुदत : ६ ते ८ सप्टेंबर
५) निवड यादीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे : ७ ते १२ सप्टेंबर
शुक्रवारपर्यंतची अर्जांची आकडेवारी दृष्टिक्षेपात
- कला (इंग्रजी माध्यम) : ७४
- कला (मराठी) : १३६०
- वाणिज्य (मराठी) : १९८०
- वाणिज्य (इंग्रजी) : १६२०
- विज्ञान : ५९२०