Kolhapur: तरुणांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यासह दोघांवर जीवघेणा हल्ला, विद्यार्थी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:12 PM2024-11-28T16:12:47+5:302024-11-28T16:13:42+5:30
हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले
कोल्हापूर : उचगाव येथील मणेर माळ परिसरात एका बिअर शॉपीजवळ सुरू असलेला तरुणांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेत कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी गौरव पोवार (वय २०, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. सोलापूर) याच्यासह विनायक महादेव माळी (३०, रा. उचगाव) हे जखमी झाले दोन्ही जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. गौरव पोवार याची प्रकृती गंभीर आहे.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मणेरमाळ परिसरातील एका बियर शॉपी जवळ तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू होती. वाद सोडवण्यासाठी गौरव पोवार आणि विनायक माळी पुढे गेले. त्यांनी तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही तरुणांनी एडका, कोयता अशा धारदार शस्त्रांसह दोघांवर हल्ला केला या घटनेत गौरव पोवार याच्या पोटात आणि छातीत खोलवर जखम लागल्याने तो जमिनीवर कोसळला तर विनायक माळी यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
जीवघेण्या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. अभिजीत बाबासाो यादव आणि अविनाश जनार्दन मोळे यांनी तातडीने जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. पोवार याच्या पोटात आणि फुफ्फुसाला दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सीपीआरमधील डॉक्टरांनी दिली. त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
हल्लेखोर कोण?
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस मणेरमाळ परिसरात पोहोचले. येथील बिअर शॉपीजवळ आधीच काही जणांचा वाद सुरू होता. त्यानंतर दोघांवर जीवघेणा हल्ला झाला. एकमेकांशी वाद घालणारे आणि जीवघेणा हल्ला करणारे नेमके कोण होते, याचा शोध घेण्याचे काम गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे.