मूक-कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:40 PM2020-02-17T15:40:05+5:302020-02-17T15:41:59+5:30
मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कोल्हापूर : मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी महापौर सागर चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमातून आम्हाला जगण्यासाठी नवी उमेद मिळाली, असे अनेकांनी भावना व्यक्त केली.
ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. त्यांना मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते. स्वत:च्या या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसले आणि कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात. मात्र या सर्वांना एकत्र करत त्यांच्या स्वप्नांना उंच भरारीसाठी पंखाचे बळ देण्यासाठी या निमित्ताने सांस्कृ तिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सुमारे तीस मूक -बधिरांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. मूकबधिर बांधवांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना कार्यक्रमाची रुपरेषा पाठवली होती. सुमारे सातशेहून अधिक सभासद उपस्थित राहिले.
असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी संस्थेची भूमिका मांडली. सल्लागार राहुल चव्हाण यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
यावेळी मुंबईचे सुनील सहस्त्रबुध्दे, अमोल घागरे, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे जालनाचे अध्यक्ष मनोज पटवारी, मुंबईचे सचिव प्रदीप मोरे, नाशिकचे जयसिंग काळे, मुंबई स्पोर्टस्चे कौन्सिल आॅफ दि डेफ पुणेचे उपाध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र अध्यक्ष ईर्शाद खान, गोपाळ बिरारे, चेतन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्ह्याचे उपाध्यक्ष अतुल फणसाळकर, सेक्रेटरी अमोल गवळी, उप सेक्रेटरी अतुल भाळवणे, गौरव शैलार, तेजस मुरगुडे, संतोष मिठारी, अमोल कवाळे, धीरज कांबळे, जयश्री गवळी, प्रियांका महामुनी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
व्हिडिओ कॉलद्वारे संवाद
मूकबधिर व्यक्तींच्या परस्पर संवादावर बंधने असली, तरी खाणाखुणा करून त्या एकमेकांशी संवाद साधू शकतात; मात्र फोनवरून असा संवाद साधणे अशक्य होते. काहींना काही कारणास्तव मेळाव्यास येता आला नाही, अशा एका नरेश साळवी या मूक-बधिर बांधवाने व्हिडिओ कॉलद्वारे सांकेतिक भाषेत संवाद साधत गैरहजर राहिलेल्या आपल्या मित्राला सभागृहातील वातावरण दाखवत होता.
६० जणांची नोंदणी
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ६० मुला-मुलींनी नोंदणी केली.
खेळाडूंचा सत्कार
असोसिएशनच्यावतीने संतोष चंद्रकांत मिठारी, सुबिया मुल्लाणी, आदेश रुकडीकर, रोहित शिकलगार, अमृता जाधव, धीरज कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.