स्वच्छतागृहाअभावी भाविकांची कुचंबणा

By admin | Published: March 29, 2015 11:47 PM2015-03-29T23:47:25+5:302015-03-30T00:14:34+5:30

शाहू मैदान परिसर : अनियमित, कमी दाबाने पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारांमुळे डासांचे साम्राज्य-- लोकमत आपल्या दारी

Deafness of the devotees due to lack of cleanliness | स्वच्छतागृहाअभावी भाविकांची कुचंबणा

स्वच्छतागृहाअभावी भाविकांची कुचंबणा

Next

सचिन भोसले/ प्रवीण देसाई  - कोल्हापूर -अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांनाही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबणा होते. हे चित्र गजबजलेल्या व मध्यवस्तीत असणाऱ्या शाहू मैदान येथे पाहायला मिळते. येथील समस्या शहरातील इतर प्रभागांप्रमाणेच आहेत. अनियमित पाणी, तुंबलेल्या गटारांमुळे डासांचे साम्राज्य, पर्यटक, भाविकांच्या वाहनांसाठी असणाऱ्या पार्किंग झोनमधील उडणारी धूळ थेट घरांत येत असल्याने आरोग्याचे प्रश्न, अशा अनेक समस्या स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात मांडल्या.
शहराच्या मध्यवस्तीतील गर्दीचा व दाटीवाटीचा परिसर म्हणजे शाहू मैदान परिसर. या परिसराभोवती ऐतिहासिक जुना राजवाडा, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, शाहू खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, देवल क्लब, बालगोपाल तालीम अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामध्ये अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रासह देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने दररोज भाविकांचा ओढा जास्त असतो. परिणामी भाविकांच्या वाहनांचे पार्किंग व त्यांचे येणे-जाणे हे या परिसरातूनच आहे; परंतु त्यामानाने या सुविधा दिसत नाहीत. भवानी मंडपापासून मिरजकर तिकटीपर्यंत असणारे कोंडाळे नेहमी कचऱ्याने फुल्ल भरलेले असतात. त्यामुळे पर्यटक व भाविकांचे स्वागत कचऱ्याने होते. त्यांना नाकाला रूमाल लावूनच येथून जावे लागते. कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने कचराकुंड्या नेहमीच भरलेल्या असतात. बालगोपाल तालमीच्या पिछाडीस व बिंदू चौकातील सबजेल शेजारी तयार करण्यात आलेला पार्किंग झोन म्हणजे अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लुटण्यासाठी व कुणाचे तरी खिसे भरण्यासाठी केलेला ‘झोन’ असल्याची तक्रार मांडण्यात आली. या ठिकाणी डांबरीकरण नसल्याने पर्यटकांच्या वाहनांच्या वर्दळीने धूळ थेट परिसरातील घरांत जाते. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटक, भाविकांसह येथील नागरिकांची गैरसोय होते. गटारींची अवस्था फार वाईट आहे. त्या वेळेवर स्वच्छ होत नसल्याने वारंवार तुंबतात. त्यामुळे पावसाळ्यात तर या ठिकाणी अस्वच्छ पाण्याची डबकी तयार होतात. बालगोपाल तालमीसमोर स्थानिक नागरिकांच्या पाठपुराव्याने सुमारे तीस वर्षांनंतर डांबरी रस्ता झाला. त्या रस्त्याचे काम बजेटएवढे झाले की नाही अशी शंका उपस्थित करण्यात आली. कारण ते निकृष्ट झाल्याचे काही दिवसांतच दिसून आले.
या मार्गावरील डेरेदार झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत. परिसरातील रहदारी पाहता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेला वारंवार कळवूनही आतापर्यंत दुर्लक्षच आहे. परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. कमी दाबाने, अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शाहू मैदान येथील केएमटी थांबा येथे सकाळी दहा व सायंकाळी पाचनंतर गर्दी होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे वादावादीचे प्रकारही घडतात. येथे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती होणे गरजेचे आहे.



घरात धुळीचे साम्राज्य
बिंदू चौक, बालगोपाल तालीम परिसरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. बिंदू चौक सबजेलपाठीमागील पार्किंग परिसराचेही डांबरीकरण करण्याची गरज आहे. वाहनांची सतत वर्दळ असल्याने घरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. - निवास शिंदे
मुतारी, शौचालय हवे
बिंदू चौक सबजेलच्या पाठीमागे महापालिकेने पर्यटकांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. मात्र, येथे येणाऱ्या भाविक पर्यटकांसाठी मुतारी व शौचालय नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मोठी कुचंबणा होत आहे. याशिवाय जुन्या देवल क्लबजवळील पथदिवा गेले कित्येक दिवस बंद आहे.
- अंजुम झारी
बहुमजली पार्किंग करा
बिंदू चौक येथे महापालिकेने
शाळा पाडून
केलेले पार्किंग कोणत्याही सुविधेविना केले आहे. हे पार्किंग केवळ कुणाचा तरी खिसा भरण्यासाठी केले आहे. आहे त्याच जागी पुण्या-मुंबईसारखे बहुमजली पार्किंग
केल्यास पर्यटक व नागरिकांची चांगली सोय होईल. या साध्या
सुविधा देता येत नसतील तर महापालिकेची पूर्वीप्रमाणे नगरपालिका करा.
- निवासराव साळोखे
अंतर्गत रस्त्यावर ताण
खासबागकडून बिंदू चौकाकडे जाणारी वाहतूक एकेरी केल्याने दुचाकीचालक
बिंदू चौक सबजेल पाठीमागील रस्त्यावरून थेट मिरजकर
तिकटीपर्यंत जात आहेत. हा वाहतुकीचा ताण बालगोपाल तालीम परिसरातील अंतर्गत रस्त्यावर वाढला आहे. देवल क्लबजवळील पथदिवा सुरू करावा.
- सुदेश वारंगे
बुरुजांचे संरक्षण
बिंदू चौक परिसरातील बुरुजांची देखभाल करावी. परिसरात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कचरा कुंड्यांची संख्या वाढवावी. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा द्या.
- आनंदा पोवार
महिला भाविकांसाठी स्वच्छतागृह
शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने भाविक बिंदू चौक परिसरात पार्किंग करून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पर्यटकांसाठी, विशेषत: महिला भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी.
- धनंजय चव्हाण
वाहतूक पोलिसाची आवश्यकता
प्रायव्हेट हायस्कूल, नूतन मराठी हायस्कूल, एमएलजी हायस्कूल येथे सकाळी दहा व सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दी असते. याच दरम्यान कार्यालयेही सुटत असल्याने वाहतूक प्रचंड वाढते. त्यातच केएमटी बसथांबा व पायी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी होते. यादरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी. खासबाग चौकात नियमित वाहतूक कोंडी कमी होईल.
- रमेश मोरे
विक्रेत्यांना आवरा
भवानी मंडप येथे पार्किंगसह खाद्यपदार्थ, भाजी विक्रेते असे अन्य विक्रेतेही ठिय्या मांडत असल्याने एकूणच कोल्हापूरचा चेहरा आता पुण्या-मुंबईसारखा होऊ लागला आहे. यावर महापालिका कोणतीही कारवाई करीत नाही. परिसरातील जुन्या ड्रेनेज लाईनची कामे त्वरित करा.
- हिंदुराव घाटगे

Web Title: Deafness of the devotees due to lack of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.