वडगाव बाजार समितीसमोर भरलेले सौदे पालिकेकडून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:51+5:302021-05-29T04:19:51+5:30
: लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बाजारातील गर्दी कमी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेने आठवडा बाजारावर नियंत्रण ...
: लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बाजारातील गर्दी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेने आठवडा बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारी पहाटे इचलकरंजीतील वडगाव बाजार समितीसमोर भरलेले सौदे बंद केले. तसेच शहरातील विविध ठिकाणी भरणाऱ्या बाजारातही आखून दिलेल्या चौकोनांमध्येच विक्रेत्यांना बसण्यास भाग पाडले. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत प्रथमच बहुतांश ठिकाणच्या बाजारातील गर्दी कमी झाल्याचे दिसले.
शहरात बाजारामध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्री व आठवडा बाजाराच्या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये शुक्रवारी पहाटे आठवडा बाजार असल्याने वडगाव बाजार समितीसमोर सौदे करण्यासाठी गर्दी झाली होती. तेथे हस्तक्षेप करत ते सौदे बंद केले. त्यानंतर विकली मार्केट येथे भरणाऱ्या बाजाराच्या ठिकाणी विक्रेत्यांसाठी खास मांडणी केली होती. तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी मार्ग निश्चित केला होता. गर्दी न करता विक्रेत्यांनी भाजीपाल्याची मांडणी केली आणि ग्राहकही नियमाप्रमाणे ये-जा करत होते.
दक्षतेचा भाग म्हणून विकली मार्केटमधील १२५ आणि झेंडा चौकात बसणाऱ्या २५ फळे, भाजीपाला विक्रेत्यांची अॅँटिजन तपासणी केली. त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. प्रशासनाच्या नियोजनामुळे बाजारावरील गर्दीवर नियंत्रण आल्याचे दिसून आले.