अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद
By भीमगोंड देसाई | Published: December 15, 2023 02:02 PM2023-12-15T14:02:03+5:302023-12-15T14:02:23+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना ...
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना बेकायदेशीरपणे महापालिका आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दाखल्याची सक्ती करत आहे. परिणामी वैद्यकीय दाखला मिळेपर्यंत मृतदेह तासनतास घरीच ठेवावा लागत आहे. यामध्ये दाखला मिळवण्याच्या व्यवस्थेबद्दल पुरेसे ज्ञान नसणाऱ्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. त्यांना नाहक कोणाकडे तरी जाऊन दाखल्यासाठी याचना करावी लागत आहे.
माणसाचे कायदेशीर आयुष्य निश्चित करण्यासाठी जन्म आणि मृत्यू नोंद अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी कायदा आहे. या कायद्यानुसार या नोंदी करणे बंधनकारक आहे. कायद्यातील तरतुदीनुसार घरी मृत्यू झाल्यास कुटुंब प्रमुखांनी मयताची माहिती दिल्यानंतर अंत्यविधी आणि मृत्यू नोंद करणे आवश्यक आहे.
मात्र येथील महापालिका आरोग्य प्रशासन ज्यांच्या घरी मयत झाले आहेत त्यांच्या नातेवाइकांनाच वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला आणा, अन्यथा अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी नियमबाह्य आडकाठी लावत आहे. अशीच कार्यपद्धती राबवावी, असे कोठेही कायद्यात नाही, तरी महापालिका प्रशासन नातेवाइकांना वेठीस धरत असल्याचे समोर आले आहे.
कायद्यातील पळवाट शोधून काही जण मालमत्ता व इतर कारणांसाठी जिवंत असणारे व्यक्ती मयत दाखवतील, घरात घातपाताने मयत होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासन सरसकट सर्वांनाच घरी मयत झाली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला आणा, अन्यथा तुम्हाला अंत्यसंस्कार करता येणार नाही, असा स्वयंघोषित नियम लावत आहे. परिणामी दाखला मिळाला नाही तर अंत्यसंस्कार रखडत आहे. याकडे लक्ष वेधून महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.
दवाखान्यात मृत्यू झाल्यास दाखला मिळतो..
दवाखान्यात मृत्यू झाल्यास किंवा शवविच्छेदन झाल्यास मृत्यूचा दाखला सहजपणे मिळतो. पण घरी मृत्यू झाल्यास दाखल्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. शोध घेऊन दाखला मिळवावा, अशी कायद्यात कोठेही म्हटलेले नसताना महापालिका अशी का सक्ती करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मृत्यू प्रमाणपत्राचा उपयोग काय?
वडिलोपार्जित हक्क आणि संपत्ती या विषयाचा निर्णय घेणे, विम्याच्या दाव्यासाठी, कुटुंबाचे निवृत्तिवेतन मिळण्यासाठी मृत्यू दाखला प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यामुळे मृत्यू नोंद २१ दिवसांच्या आत करून घ्यावी लागते.