पतंगाच्या नादात मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By admin | Published: November 1, 2015 12:52 AM2015-11-01T00:52:21+5:302015-11-01T00:56:21+5:30
विक्रमनगर परिसरात घटना
इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शालेय विद्यार्थ्यांचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तुषार संतोष सोनवणे (वय १३) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत करून बालकाचा मृतदेह खाली उतरविला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विक्रमनगर परिसरातील मुरदंडे मळ्यात सुशीला सोनवणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा १३ वर्षांचा शाळकरी मुलगा तुषार याला शनिवारी दुपारी परिसरातील विष्णू राजाराम यांच्या यंत्रमाग कारखान्यावर असलेल्या विद्युत वाहिनीला अडकलेला पतंग दिसला. हा पतंग काढण्याचा मोह त्याला आवरला नाही. तो कारखान्याच्या स्लॅबवर चढला आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी त्या वाहिनीचा त्याला जबर धक्का बसून तो वाहिनीला चिकटला. यावेळी वीज मंडळाला माहिती दिल्यानंतर कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तुषारला खाली उतरविण्यात आले व उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.