अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:59 PM2018-06-26T15:59:55+5:302018-06-26T16:05:42+5:30
काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत.
श्रीनगर/कोल्हापूर : काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल जे. व्ही. महाडिक (कॉर्प्स आॅफ आर्टिलरी) हे जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील खुंडरु येथील स्टेशन मुख्यालयात अॅडम कमांडट म्हणून सेवेत होते. सोमवारी दुपारी ४ वाजून २0 मिनिटांनी हा अपघात झाला. ते सेवेच्या ठिकाणाहून निवासस्थानाकडे जिप्सी वाहनातून जात होते. चालकाशेजारीच ते बसले होते.
प्रवासादरम्यान त्यांच्याजवळील व्यक्तिगत कार्बाईनमधून ही गोळी सुटली. ही बंदूक त्यांनी आपल्या मांडीवर ठेवली होती. त्यातून अचानक गोळी सुटून ती कर्नल महाडिक यांच्या डोक्यातून मानेत घुसली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले, परंतु त्यांचा मृत्यू झाला.
महाडिक हे नुकतेच अभ्यास रजेवरुन सेवेच्या ठिकाणी रुजू झाले होते. डिसेंबर १९८९ मध्ये ते कॉर्प्स आॅफ आर्टिलरी म्हणून सेवेत दाखल झाले होते. सेट झेवियर स्कूलच्या १९८३ च्या तुकडीचे ते विद्यार्थी होत. त्यांची काश्मिरमध्ये अलिकडेच नेमणुक झाली होती. कोल्हापूरातील राजारामपुरी आणि महालक्ष्मीनगर परिसरात त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर त्यांचा दिल्लीत मुक्काम होता.