दिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:33 PM2018-12-01T15:33:12+5:302018-12-01T16:58:28+5:30
दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.
कोल्हापूर: दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.
यासंदर्भात दिल्लीत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, दिल्लीत देशभरातील १८0 शेतकरी संघटनांनी शुक्रवारी संसद घेराओ मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातून विशेष रेल्वेने शेतकरी गेले होते. त्यांची राहण्याची सोय आंबेडकरभवन येथे करण्यात आली होती.
येथे ५00 ते ६00 शेतकरी वास्तव्यास होते. मोर्चानंतर सर्व शेतकरी झोपे गेले होते. अकराच्या सुमारास किरण गौरवाडे बाहेर आले. गॅलरीमध्ये तंबाखू खाउन थुकत असताना त्यांचा तोल जाउन चौथ्या मजल्याने ते खाली कोसळले. सर्व शेतकरी झोपी गेल्याने याची कुणालाच कांही कल्पना आली नाही.
पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व शेतकऱ्याना याची कल्पना दिली. डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
ही घटना समजल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी धाव घेउन सर्व माहिती घेतली. श्रध्दांजली वाहिल्यानंतर दुपारी विशेष विमानाने प्रेत शिरोळकडे रवाना करण्यात आले. गौरवाडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
दिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यू, राजू शेट्टींनी वाहिली श्रद्धांजली #Farmerspic.twitter.com/ZtVqpQ1UtG
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 1, 2018