शियेतील अतिक्रमणाविरोधात वनविभागासमोर आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:56+5:302021-08-18T04:29:56+5:30
कोल्हापूर : शिये, ता. करवीर येथील वनविभागाच्या जमिनीवरील गावातीलच धनधांडग्याच्या अतिक्रमणाविरोधात गावातील अमोल हंबीरराव शिंदे याने आवाज उठवला आहे. ...
कोल्हापूर : शिये, ता. करवीर येथील वनविभागाच्या जमिनीवरील गावातीलच धनधांडग्याच्या अतिक्रमणाविरोधात गावातील अमोल हंबीरराव शिंदे याने आवाज उठवला आहे. मुख्य वनसंरक्षकापर्यंत याबाबात सातत्याने पत्रव्यवहार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी सोमवारपासून रमण मळ्यातील वन उपसंरक्षणच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करू, असा इशारादेखील दिला आहे.
उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, शिये गावातील गट नंबर १८७ या पारंपरिक जंगल असणाऱ्या वनविभागाच्या जमिनीवर ग्रामस्थांनी मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण केले आहे. याबाबत वनअधिकाऱ्यांशी आर्थिक देवघेव करून जमिनी बळकावल्या आहेत. ही अतिक्रमणे काढण्यासाठी गेली ८ वर्षे जिल्हाधिकारी कार्यालय, शिये ग्रामपंचायत, वनविभागाची सर्व कार्यालये यांना २५ हून अधिक वेळा पत्रव्यवहार केला आहे. याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने अतिक्रमणे सुरूच आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या जात आहेत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी, कारवाईची सुबुद्धी यावी आणि वनजमिनीचे संरक्षण व्हावे यासाठी हे उपोषण सुरू केले आहे.
फोटो: १७०८२०२१-कोल-शिये उपोषण
फोटो ओळ: शिये (ता. करवीर)मधील भूखंड माफिया व भ्रष्ट वनअधिकाऱ्यांच्या विरोधात अमोल हंबीरराव शिंदे यांनी वनसंरक्षक कार्यालयसमोर उपोषण सुरू केले आहे.