CoronaVIrus In kolhapur : कोरोनाने घरच संपवले : मुुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:52 AM2021-04-28T10:52:15+5:302021-04-28T10:59:58+5:30
CoronaVIrus In kolhapur : चार दिवसांपूर्वी एकुलत्या एका तरुण मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी ५६ वर्षीय पित्याचाही हृदयविकाराने मृत्यू झाला, तर आईही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांनाही मानसिक धक्का बसून त्याही शून्यात गेल्या. कोरोनाने अशा पद्धतीने एका कुटुंबांची वाताहत झाल्याची दुर्दैवी घटना राजारामपुरी दुसरी गल्ली, टाकाळा येथे घडली.
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी एकुलत्या एका तरुण मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी ५६ वर्षीय पित्याचाही हृदयविकाराने मृत्यू झाला, तर आईही कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांनाही मानसिक धक्का बसून त्याही शून्यात गेल्या. कोरोनाने अशा पद्धतीने एका कुटुंबांची वाताहत झाल्याची दुर्दैवी घटना राजारामपुरी दुसरी गल्ली, टाकाळा येथे घडली.
टाकाळा चौकानजीकच्या अपार्टमेंटमध्ये एक वृद्ध दांपत्य २५ वर्षीय मुलगीसह राहत होते. त्यातील वृद्धा ही सीपीआरमधून नर्स म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या पेन्शनवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. शुक्रवारी त्यांच्या मुलीचा कोरोनाने बळी घेतला. मुलगी गेल्याचा जबर धक्का दांपत्याला बसला. त्यातच वृद्ध आईची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर वडिलांची निगेटिव्ह आली, पण दोघेही मुलीच्या मृत्यूच्या मानसिक धक्क्यातून बाहेर आले नाहीत.
मंगळवारी त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तेथील तरुणांनी राजारामपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी दुपारी येऊन दरवाजा उघडला असता वृद्धा या पतीच्या मृतदेहानजीक शून्यात बसून होत्या. त्याही पॉझिटिव्ह असल्याची माहिती असल्याने मदतीसाठी शेजारील कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नव्हते.
पोलिसांनीच धाडसाने पुढे जाऊन मृतदेह तपासला असता वृद्ध मृत आढळले. डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. संबंधित वृद्ध महिलेलाही धक्का बसल्याने त्यांचेही मानसिक संतुलन बिघडले होते. त्याही शून्य नजरेत बसूनच होत्या. अखेर सायंकाळी त्यांना रुग्णवाहिकेतून अलगीकरण कक्षात दाखल केले, तर काही नातेवाइकांना बोलवून त्या वृद्धाच्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले.
दक्षता न घेतल्याने अख्ख्या कुटुंबांची वाताहत
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना त्यातच अनेक कुटुंबांची वाताहात होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांना मदतीसाठीही कोणीही धावून येत नाही. दक्षता न घेतल्याने घरात एका व्यक्तीमुळे अनेकांना संसर्ग होऊन अख्खे घरच उद्ध्वस्त होत आहेत. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत अशीच घटना मंगळवारी घडली.