शिरटेच्या माहेरवाशीणीने मृत्यूनंतर दिले चारजणांना जीवदान
By Admin | Published: April 2, 2017 11:31 PM2017-04-02T23:31:15+5:302017-04-02T23:31:15+5:30
जाताना जिंकली हजारो मने : मुलुंडमधील ६२ वर्षीय महिलेला बसविले हृदय, तर पुण्यातील रुग्णास किडनी दान
निवास पवार ल्ल शिरटे
शिरटे (ता. वाळवा) येथील ५0 वर्षीय सौ. संगीता आनंदराव सावंत यांनी अपघातात आपले जीवन गमावले. मात्र अशा अखेरच्या क्षणातही प्रत्येकाचे जीवन अमूल्य आहे, याची जाणीव ठेवत हृदय, दोन किडन्या व यकृत अशा अवयवांचे दान करून मृत्यूपश्चातही आपण जीवनदूत बनू शकतो, असा आदर्श वस्तूपाठ घालून दिला.
संगीता सावंत यांच्या या कृतीने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ ही उक्ती सार्थ ठरली. पतीने लष्करातून देशाची सेवा केली, तर या माऊलीने चारजणांना जीवनदान देऊन मानव कल्याणाच्या सेवेत एक पाऊल पुढे टाकले. संगीता सावंत यांचे शिरटे (ता. वाळवा) हे माहेर, तर कऱ्हाड तालुक्यातील कापिल हे सासर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सध्या त्या पुणे येथे वास्तव्यास होत्या. संगीता यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्या पतीसोबत कमांडो रुग्णालयात गेल्या होत्या.
तेथून औषधोपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना मुंढवा-हडपसर मार्गावर मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी बिर्ला रुग्णालयात दाखल केले. १९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्या शुध्दीवर आल्याच नाहीत. विविध उपचार करूनही त्यांच्या शरीराने कसलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत ३० मार्च रोजी मालवली.
संगीता यांनी मरणोत्तर अवयव दान करण्याची इच्छा त्यांच्या कुटुंबियांना वारंवार बोलून दाखवली होती. त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय सावंत कुटुंबियांनी मोठ्या धिराने घेतला. त्यांची एक किडनी बिर्ला येथील रुग्णालय, दुसरी किडनी व यकृत रुबी हॉल रुग्णालयातील गरजूंना बसविण्यात आली, तर मुलुंड फोर्टीस रुग्णालयातील ६२ वर्षीय महिलेला संगीता सावंत यांचे हृदय बसविण्यात आले आहे. त्यांच्या या अवयव दानामुळे चारजणांचे प्राण वाचले आहेत. त्या जरी आज या जगात नसल्या तरी, त्यांच्या अवयव दानामुळे त्या नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहणार आहेत.
मुंबईपर्यंत ग्रीन कॅरिडॉर
संगीता सावंत यांचे हृदय पुण्याहून मुंबईला नेण्यासाठी विमानतळापर्यंतचे २६ कि. मी. चे अंतर अवघ्या २२ मिनिटात पोलिसांच्या सहकार्याने ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून पार करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमध्ये ७ पोलिस अधिकारी व ५८ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.